अहमदनगर : महापालिका हद्दीतील ओढे-नाल्यांची पावसाळ्यापूर्वीच स्वच्छता होणे अपेक्षित असते. मनपाकडून मात्र हे काम धिम्यागतीने सुरू आहे. पावसाळ्यातील आपत्तीचा विचार करता मनपाने ही कामे मातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत खाेसे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील स्ट्रॉम वॉटर गटर या पावसाळ्यापूर्वीच स्वच्छ होणे गरजेचे होते. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही बंदीस्त व उघड्या गटारींची साफसफाई सुरु ही झालेली नाही. पावसाळा अगदी तोंडावर आलेला असूनही मनपा प्रशासन या सर्व गोष्टींबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जर कमी अधिक प्रमाणावर पाऊस झाला, तर हे ओढे नाले व गटार यांची साफसफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी हे नागरिकांच्या घरांमध्ये घुसून आपत्ती ओढावण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक नैसर्गिक ओढे-नाल्यावंर बिल्डरांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये घुसते. ही बाब गांभर्याने घेत मनपाने नैसर्गिक ओढे-नाल्यांतील अतिक्रमण काढून तातडीने सफाई करावी. निवेदन देतेवेळी खोसे यांच्यासह पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, नितीन लिंगडे,रुपेश चोपडा, श्रेनिक शिंगवी, ॲड. गजेंद्र दांगट, राजूकोकणे, राम पिंपळे, तनवीर मनियार, महेंद्र कवडे, किरण पंधाडे, अभिजित खरपुडे, सुमित कुलकर्णी, सुनंदा कांबळे, अलिशा गर्जे, सुनिता पाचारणे, गीता कामत आदी उपस्थित होते. शहरातील ओढे-नाले, गटारी यांची पावसाळ्यापूर्वी सफाई केली जाणार असल्याचे यावेळी आयुक्त डॉ. जावळे यांनी सांगितले.