प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ख्रिस्ती धर्माचा पाया प्रेम, दया, शांती त्याग व बलिदानातून उभारलेला आहे. केवळ प्रेमावर आधारलेल्या ख्रिस्ती धर्मीयांचा छळ करणे म्हणजे, समाजात दहशत निर्माण करणे असे आहे. जाणूनबुजून ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखवून समाजामध्ये शांतता भंग करण्याचा काही समाजकंटकांचा हेतू दिसतो. राजकारणविरहित सेवा करणाऱ्या ख्रिश्चनांवर अनेकदा खोटे-नाटे आरोप करण्यात आले; परंतु शांतताप्रिय ख्रिश्चनांनी आजपर्यंत सर्व निमूटपणे सहन केले.
ख्रिस्ती मिशनरी ग्रॅहम स्टेन्स. फादर स्टॅन स्वामी, वसईतील सांडोरा भागातील बांभोळी येथील निराश्रित माता आश्रमातील धर्मगुरू फादर पिटर बोंबाचा यांची हत्या. त्यानंतर अनेक प्रकरणांत सेविकांवर बलात्कार, प्रार्थनास्थळांची मोडतोड, ते कालपरवा झालेला कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड (चांदगड) येथील चर्चमधील हल्ला, बीड व अकोले तालुक्यातील घटना आणि आता रत्नागिरी येथील सेवकांना झालेली मारहाण, अशा अनेक घटना सतत घडत आहेत. यापुढे जाऊन मदर तेरेसा यांच्या कार्यावर संशय व्यक्त करणे, मिशनरी आणि त्यांचे कार्य याबाबत उपरोधिक वक्तव्य करणे, वाहिन्यांवरील कार्यक्रमातून ख्रिस्ती धर्म आणि धर्मग्रंथाचा उपहास करणारे अवमानकारक प्रसंग घडत आहेत. या घटनांवरून ख्रिस्ती धर्म संपविण्याचा कट तर नाही ना, अशी शंका वाटत आहे. अवघे सव्वा दोन टक्के लोकसंख्या असलेले ख्रिस्ती लोक देशावर कोणतेही संकट आले तर त्यासाठी प्रार्थनापूर्वक प्रत्यक्ष मदतीसाठी तत्पर असतात; परंतु या शांतताप्रिय समाजाला नेहमीच लक्ष्य करून विचलित करण्याचा होणारा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. या पुढील काळामध्ये अशा घटना घडू नये व घडलेल्या घटनेत जे दोषी आहेत त्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.