राहुरी : मुळा धरणाचा डावा कालवा शनिवारी सकाळी बंद करण्यात आला. उजव्या कालव्यातून ११०७ क्युसेकसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. सद्यस्थितीत धरणात २१ हजार २९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाच्या डाव्या कालव्याखाली ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील पिके ओलीताखाली आली आहे़त. डाव्या कालव्याचे आवर्तन २१ दिवस सुरू होते. उजव्या कालव्यातून ३० हजार हेक्टरखालील पिके ओलिताखाली आले आहेत. उजव्या कालव्याखालील भरणे सुरू आहे. पुढील आठवड्यात कालवा बंद होण्याची शक्यता आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर समाधानकारक पाऊस पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून नदीपात्रातून पाणी सोडावे लागले होते. पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याव्दारे डाव्या व उजव्या कालव्याखालील क्षेत्र भरण्यात आले होते. दोन्ही कालव्याखाली असलेले तळेही पाण्याने भरण्यात आले होते. यंदा आणखी दोन आवर्तन शेतीसाठी मिळणार आहेत.मुळा धरणाच्या डाव्या कालव्याखालील भरणे पूर्ण झाल्याने शनिवारी आवर्तन बंद करण्यात आल्याची माहिती उपअभियंता विकास गायकवाड यांनी दिली. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. उजवा कालव्याचे शेतीसाठी आवर्तन सुरू असून काही दिवसांनी बंद करण्यात येईल, असे मुळा धरण अभियंता आण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.
मुळा धरणाचा डावा कालवा बंद; उजव्या कालव्यातून आवर्तन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 1:37 PM