शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचा फैलाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले़. त्या पाठोपाठ बुधवारी शिर्डीतीलमुस्लीम बांधवानी मज्जीदमध्ये सामुदायिक नमाज पठण न करण्याचा निर्णय घेतला आहे़.गर्दी टाळण्यासाठी प्रशासन व नागरिकांकडूनही वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी सर्व जाती, धर्माचे, पंथाचे नागरीक हातात हात घालून एकदिलाने प्रयत्न करीत आहेत. याचाच भाग म्हणून बुधवारी शिर्डीतील मज्जीदमधील नमाज प्रातिनिधीक स्वरूपात पठण करण्याचा निर्णय घेतला. नमाजाच्या वेळी मज्जीदमध्ये एक इमाम व दोघे-तिघे असती. बाकी मुस्लीम बांधव आपआपल्या घरी नमाज पठण करतील, असा निर्णय येथील मुस्लीम समाज, मज्जीद ट्रस्ट व इमाम यांनी घेतला आहे. बुधवारी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, पोपटराव शिंदे, बिलालभाई शेख, जामा मज्जीद ट्रस्टचे नसीरभाई दारुवाले, बाबभाई सय्यद, रजाक भाई शेख, मौलाना मन्सूर, मौलाना नईम, पठाण भाई , समसुद्दीन भाई, सरदार भाई, गनीभाई पठाण, जमादार भाई इनामदार, शौकतभाई सय्यद, मौलाना मोबिन, मौलाना अन्वर, गफारखान पठाण आदींची प्रमुख उपस्थीती होती. प्रांताधिकारी शिंदे यांनी मुस्लीम समाजाचे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले आहे.
शिर्डीत मज्जीदमधील सामुदायिक नमाज पठण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 3:50 PM