लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मागील ५ दिवसांपासून रोज ढग येतात. त्यापाठोपाठ हवामान खात्याचा पावसाचा इशाराही येतो. मात्र, पाऊस न पडता ढग तसेच निघून जातात. आभाळाकडे नजरा लावून बसलेला शेतकरी पुन्हा माना टाकलेल्या पिकांकडे पाहत ओशाळून जातो, असे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील पाच दिवसात जिल्ह्यात अवघा १९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे जमिनीत असलेली ओलदेखील झपाट्याने कमी होत आहे. परिणामी पिके सुकू लागली आहेत.
जिल्ह्यात या वर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबली. हंगाप पूर्णपेण वाया जाऊ नये म्हणून थोड्याशा ओलीवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर तरी चांगला पाऊस होईल व पिके जोमाने येतील, या आशेवर शेतकरी होता. मात्र, पेरणीनंतरही पावसाने पाठ फिरवली. उगवून आलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. आता दुबार पेरणीची वेळही निघून गेली आहे. त्यामुळे उगवून आलेले पिक वाचावे, यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरु आहे. पावसाची रोज वाट पाहत आहेत. रोज ढग येतात अन् निघून जातात. पाऊस काही पडत नाही.मागील पाच दिवसातील पाऊसदिनांक झालेला पाऊस१९ जुलै १४.२ मिली२० जुलै ०.६ मिली२१ जुलै १.१ मिली२२ जुलै २.७ मिली२३ जुलै ०.५ मिलीएकूण १९.२ मिलीसंगमनेर तालुक्यात अवघी २० टक्के पेरणीसंगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत कमी म्हणजेच अवघी २० टक्के पेरणी झाली आहे. संगमनेर तालुक्यात खरिपाचे ५० हजार ८५० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी १० हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल कर्जत तालुक्यात ३९ टक्के पेरणी झालेली आहे. कर्जत तालुक्यात खरिपाचे ५२ हजार ३९६ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी २० हजार ७८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.धरणांमधून पाणी सोडलेधरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदी ८३५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात १२५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटातून भिमा नदीत १७५४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.