असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, सचिव सोमनाथ गोरे, गणेश सुपेकर, गोपाल चंदन, देवकर आदींनी मंत्री गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन निवेदन दिले. राज्याच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत विविध क्षेत्रांतील जवळपास २८ क्लस्टर सुरू असून ५६ पेक्षा जास्त सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. क्लस्टर योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील छोट्या उद्योगांचा विकास होत असून प्रत्येक उद्योग क्लस्टरमागे १ हजारहून जास्त रोजगारांना व नवीन रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. परंतु कोरोनामुळे क्लस्टरांना मोठा फटका बसला असून उद्योग व उद्योजक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या उद्योगांंना केंद्र शासनाच्या विविध क्लस्टर योजनांचा लाभ मिळावा, जीएसटी परतावा, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची कच्चा माल साहाय्य योजना, उद्योगांना १०० कोटींपर्यंत शासन हमीसह विनातारण कर्ज, कौशल्य विकास योजनेचा लाभ, सौर यंत्रणा तसेच शासकीय खरेदीत प्राधान्य मिळावे अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. या अडचणी सोडविण्याबाबत मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दाखवली व लवकरच याबाबत निर्णय घेतले जातील, असे सांगितले. ग्रामीण व शहरी उद्योजकांनी क्लस्टरच्या माध्यमातून विकास करावा, यासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही दिले. मंत्री गडकरी यांच्या या विकासात्मक निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील उद्योजकांना नवसंजीवनी मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करण्याची संधी मिळणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश लोळगे यांनी सांगितले.
--------
फोटो - १६एमआयडीसी
कोरोनामुळे फटका बसलेल्या क्लस्टरमधील उद्योगांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासह उद्योजकांच्या इतर मागण्यांसाठी राज्य औद्योगिक क्लस्टर असोसिएशनच्या वतीने केंद्रीय उद्योगमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले.