Ahilya Nagar : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी एका लग्न समारंभात पोहोचले. हा विवाह ८ वर्षांपूर्वी अत्याचारानंतर खून झालेल्या पीडितेच्या बहिणीचा विवाह होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लग्नाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी या लग्नाला हजेरी लावली आणि नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला आश्वासन दिले होते की ते त्यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतील आणि स्वतः लग्न समारंभाला उपस्थित राहतील. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या पोस्टमधून ही माहिती दिली आहे.
अहिल्यानगरमध्ये आयोजित एका विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. २०१६ मध्ये कोपर्डी बलात्कार आणि खून पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या लग्नाला हजर राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ वर्ष जुने वचन पूर्ण केले. तत्पूर्वी, ५ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर, बोन मॅरो प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी स्वाक्षरी केली. पुणे येथील रहिवासी चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या उपचारासाठी ही मदत देण्यात आली होती. चंद्रकांत यांच्या पत्नीने मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचे आवाहन केले होते, ते मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वीकारले.
"कोपर्डीत ८ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द दिला होता. आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा! या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते," असं प्रवीण दरेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "गेल्या काही वर्षांपासून मी कुटुंबाशी जोडलो गेलो आहे. त्या घटनेपासून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आपुलकी आहे. मला आमंत्रण मिळताच मी लग्नाला येईन आणि जोडप्याला आशीर्वाद देईन असे वचन दिले होते," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथे राहणाऱ्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरात जोरदार आंदोलने सुरू झाली होती. त्यावेळीही फडणवीस मुख्यमंत्री होते. मराठा क्रांती मोर्चाखाली अनेक आंदोलने झाली, ज्यात मोठ्या संख्येने लोक जमले. या आंदोलनादरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यामध्ये जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांचा समावेश आहे. भवाळ आणि भैलुमे अजूनही तुरुंगात आहेत. तर, जितेंद्रने गेल्या वर्षी येरवडा कारागृहात फाशी घेतली होती.