अहमदनगर : कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. या आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांसह प्राथमिक शिक्षकांच्या मुख्यालयात येण्या-जाण्यावर लगाम बसणार आहे. तालुक्याच्या ठिकाणाहून कितीही महत्वाचे काम अथवा फाईल असेल, ती शिपाया करवीच मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे.सामान्य प्रशासन विभाग ही प्रस्तावित आचारसंहिता तयार करत आहे. यात कोणत्या कर्मचाऱ्याचे काम आहे, ते तो कशा पध्दतीने किती वेळेत करतो, याच्या नोंदी या निमित्ताने ठेवता येणार आहेत. सर्वात महत्वाचे, कर्मचाऱ्यांना आता त्यांचे कामाचे मुख्यालय सोडताना लेखी परवानगी घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेत पाऊल ठेवता येणार नाही. तसेच अन्य कोणतीही कार्यालयीन अथवा व्यक्तिगत कामे असल्यास महिन्यातून पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारीच कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत येण्याची मुभा देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत तालुक्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांत सर्वाधिक संख्या प्राथमिक शिक्षकांची आहे. या शिक्षकांवर या आचारसंहितेच्या निमित्ताने चाप बसणार आहे. सामान्य प्रशासन विभाग येत्या आठवड्यात ही आचारसंहिता तयार करत असून त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या मान्यतेने ती लागू करणार आहेत.(प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता
By admin | Published: August 09, 2014 11:14 PM