श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील कि. मी. १३२ जोड कालव्यास पूर्ण दाबाने पूर्ण दिवस पाणी न दिल्यास राजीनामा देण्याचा इशारा जोड कालव्यावरील २९ सहकारी पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारपासून राजीनामा पत्रावर सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. कुकडी कार्यालयात सोमवारी कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. बैठकीस माजी मंत्री बबनराव पाचपुते हजर होते. यावेळी संस्था प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बंडू खंडागळे म्हणाले, जोड कालव्यास पूर्ण दाबाने पाणी न देता पाणीपट्टी मात्र पूर्ण आकारली जाते. गेल्या तीन वर्षांपासून पाणी मिळत नाही. शिवाजी जाधव म्हणाले, १६० शेततळ्यांना पाणी न सोडता शेततळ्यांचे पैसे घेतले घेतात, मात्र पाणीपट्टी संस्थेकडून वसूल केली जाते याची चौकशी व्हावी. सुमित बोरूडे म्हणाले, १३२ जोड कालव्यावर शंभर टक्के पाणीपट्टी वसुली होते मात्र दर आवर्तनात अन्याय कसा होतो? हे आवर्तन पूर्ण होण्यासाठी कुकडीत साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. २६ आॅगस्टला कुकडीचा जोड कालवा सोडावा अन्यथा मी शेतकऱ्यांबरोबर राहीन व जोड कालव्याचे गेट उघडणार, अशा इशारा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिला.(तालुका प्रतिनिधी)
कुकडीचे पूर्ण दाबाने पाणी न दिल्यास सामूहिक राजीनामे
By admin | Published: August 24, 2016 12:19 AM