अहमदनगर : सीना नदीपात्रातील साफसफाई आणि महापालिकेच्या छूटपूट कामात व्यस्त असलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील नदीपात्र वाळू तस्करांसाठी मोकाट सोडले आहेत. अवैध वाळू उपशाबाबत ‘लोकमत’सह सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करूनही कारवाई न केल्याने वाळू तस्करांना जिल्हाधिकारी यांनी अभय दिल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील नदीपात्रांमध्ये खुलेआम, अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. श्याम असावा यांनी जिल्हाधिकाºयांकडे अनेक तक्रारी केल्या. वाळू उपसा सुरू असल्याचे व्हीडिओ पाठविले. तक्रारी केल्याने वाळू तस्करांच्या अॅड. असावा यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. ‘लोकमत’नेही वृत्तमालिकेद्वारे अवैध वाळू उपशाबाबत वास्तव मांडले. त्यामुळे ‘लोकमत’वरही वाळू तस्करांची पाळत आहे. वाळूच्या बातम्या दिल्या, तर त्याचा त्रास होईल, अशी सरळ धमकीच तस्कराने ‘लोकमत’च्या आवृत्ती प्रमुखांना दिली आहे. याबाबी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निदर्शनास आणून दिल्या, मात्र ते याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत.जिल्हाधिकारी द्विवेदी हे सध्या महापालिकेच्या कारभारात व्यस्त आहेत. त्यांच्या कर्तृत्त्वाची झलक दाखविण्यासाठी ते वर्ग चारच्या कर्मचाºयांना झापत सुटले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिकेच्या कामांनाच ते प्राधान्य देत असल्याने महसूल यंत्रणेवरही त्यांचा वचक राहिलेला नाही. एकमेव सीना नदी पात्र साफसफाई करण्याचा फार्स सुरू ठेवून इतर ठिकाणचे पात्र त्यांनी तस्करांना आंदण दिले आहेत. मातीचे भराव उचलून पात्र मोकळे करण्याची त्यांची कारवाई योग्य असली तरी जिल्ह्यातील अन्य नद्यांचे मात्र वाळवंट झाले आहे. यापूर्वीचे जिल्हाधिकारी अनिल कवडे, अभय महाजन यांच्या कार्यकाळात झाला नव्हता, एवढा अवैध वाळू उपसा द्विवेदी यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर सुरू झाला आहे. ते रुजू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात वाळू तस्करांनी वाळू उपसण्याचा दणका लावला आहे. त्यामुळे त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. वाळू उपशाकडे साफ दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी द्विवेदी यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाबाबत मौनात आहेत. विखे पाटील यांच्या लोणीपासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या प्रवरा पात्रातही अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्याला नेमके कोणाचे अभय आहे? याबाबतही आता नागरिकांमध्ये चर्चा झडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तस्करांच्या मुसक्या कधी आवळणार-याची उत्कंठा ताणली आहे.
नगरच्या जिल्हाधिका-यांचे वाळू तस्करांना अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 1:38 PM
सीना नदीपात्रातील साफसफाई आणि महापालिकेच्या छूटपूट कामात व्यस्त असलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील नदीपात्र वाळू तस्करांसाठी मोकाट सोडले आहेत.
ठळक मुद्दे सीना नदीपात्रात अडकले द्विवेदी : जिल्ह्यातील नदीपात्र तस्करांसाठी मोकाट