अहमदनगर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही वृत्तपत्रात, सोशल मिडियात शिवसेने कलेक्टर हटाव अशी भुमिका जाहीर केल्याचे प्रसिध्द होत आहे. अशी कोणतीही कलेक्टर हटावची मागणी मुख्यमंत्र्याकडे शिवसेनेने केलेली नाही. शिवसेनेला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. याऊलट जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे पूर्णवेळ महापालिकेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केले. कलेक्टर हटाव या अफवेला उत्तर देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राठोड बोलत होते.यावेळी शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड उपस्थित होते.राठोड म्हणाले, आम्ही शहरातील विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यामध्ये प्रामुख्याने केडगावच्या शिवसैनिकांच्या हत्याकांडाच्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी आम्ही केली. जिल्हाधिकारी हटाव अशी आमची भुमिका आधीही नव्हती आणि आताही नाही. जिल्हाधिकारी चांगले काम करत आहेत. सीना नदीमधील अतिक्रमणे हटविली आहेत. याशिवाय त्यांनी शहरातील अतिक्रमणे काढावीत. सध्या जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्याकडे जिल्ह्यासह शहराचा अतिरिक्तकार्यभार आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण वेळा देता येत नाही. त्यासाठी महापालिकेला आयुक्त म्हणून २४ काम करणा-या अधिका-याची गरज आहे. व्दिवेदी यांच्याकडे महापालिकेचे आयुक्तपद सोपविण्यास आमची काहीही हरकत नाही, असेही राठोड म्हणाले. जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्या बदलीसंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या अफवा शहरात आहेत. मात्र असा कोणतीही मागणी आम्ही केली नसल्याचे शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे पूर्णवेळ महापालिकेची जबाबदारी द्यावी : अनिल राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 2:32 PM