जामखेड : येथील रोहन अनंता खेत्रे (वय २१) या महाविद्यालयीन तरुणाने पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. तो पुणे येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. रविवारी त्याच्यावर जामखेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ल. ना. होशिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंता खेत्रे यांचा तो मुलगा होता. पुणे येथील आकुर्डीच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयात अॅग्रिकल्चर बिजनेस मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. शनिवार, ६ आॅगस्टला सायंकाळी त्याचे खोलीतील मित्र चहापाण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी त्याने आपल्या खोलीत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नायलॉन दोरीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. एक तासानंतर त्याचे मित्र खोलीवर आले, तेव्हा आतून दरवाजा बंद होता. अनेकदा आवाज देऊनही रोहनने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सहकारी मित्रांनी मग खोली मालकास ही घटना सांगितली. त्यानंतर खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा रोहनने गळफास घेतल्याचे दिसले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. यानंतर ही घटना त्याच्या घरी सांगण्यात आली. पुणे येथेच शवविच्छेदन करून जामखेडला मृतदेह आणण्यात आला. रविवारी सकाळी ८ वाजता त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाविद्यालयीन तरुणाची पुण्यात आत्महत्या
By admin | Published: August 08, 2016 12:06 AM