शिर्डी : गत सात वर्षापासून कोमात असलेल्या डॉक्टर तरुणीला तिच्या आई-वडिलांनी बुधवारी दुपारी स्ट्रेचरवर साईमंदिरात आणून तिला आजारपणातून मुक्त करण्यासाठी साकडे घातले. मंदिराच्या इतिहासात प्रथमच घडलेला हा प्रसंग पाहून उपस्थित भाविकांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या. सर्वांनी या तरुणीच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली.बेशुद्धावस्थेतील व्यक्तीला स्ट्रेचरवर साईमंदिरात दर्शनासाठी आणण्याची घटना या निमित्ताने प्रथमच घडली़ यावेळी उपस्थित भाविकांच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्यांनीही तिच्यासाठी बाबांना प्रार्थना केली़ डॉ़ शितल बाबाराव मुंगल असे या विदर्भातील वर्ध्याच्या तरुणीचे नाव आहे़ शितलने बालरोग तज्ज्ञ म्हणून एम.डी. पर्यत शिक्षण घेतले़ ती मुंबई येथील कोकीळाबेन रूग्णालयात बालरोग विभागात अतिदक्षता विभागाची प्रमुख होती़ सात वर्षापूर्वी रूग्णालयात काम करीत असताना ती पायऱ्यावरुन पडल्याने कोमात गेली़ या घटनेच्या अगोदर केवळ वर्षभरापूर्वी तिचा विवाह झाला होता़ मात्र दैवाने तिचे आनंदाचे क्षण अल्पावधीच हिरावून घेतले़ शितलला एक बहीण आहे़ वडील राज्य परिवहन महामंडळातून कॅशियर म्हणून सेवानिवृत्त झालेत़ त्यांनी शितलच्या उपचारासाठी देशभरातील अनेक नामांकित रूग्णालयाचे उंबरठे झिजवले, मात्र यश आल नाही़ अखेर त्यांनी तिला आपल्या वर्धा येथील घरी ठेवून तिची सेवाश्रुशुषा सुरू ठेवली़दरम्यान, वडील बाबाराव यांनी यांचे मित्र व साईसेवक म्हणून साईदरबारी सेवा देणारे मुंबईतील उद्योजक भाटिया यांच्या विनंतीवरून डॉ़ शितलला रूग्णवाहिकेत घालून त्यांनी दुपारी थेट शिर्डी गाठली़ आपल्या लाडक्या लेकीला तसच बेशुद्धावस्थेत स्टेचरवर घेवून त्यांनी साईसमाधीसमोर हजेरी लावली. आपल्या हयातीत आयुष्यभर रूग्णसेवा करणा-या सार्इंनी आपल्या लेकीवर कृपादृष्टी करावी, यासाठी मुंगल दाम्पत्याने भावनाविवश होत साईबाबांना साकडे घातले.
कोमातील डॉक्टर तरुणीला स्ट्रेचरवर आणले साईदरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 1:32 PM