श्रीगोंदा : श्रीगोंदा बाजार समितीमधील घोटाळे दडपण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. सुज्ञ मतदार या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते यांनी व्यक्त केला.श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थिटे सांगवी येथे आयोजित पाचपुते गटाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस होते. पाचपुते म्हणाले, बाळासाहेब नाहाटा यांनी दिशाभूल करुन बाजार समितीच्या दोन निवडणुका बिनविरोध केल्या. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा होती. बाजार समितीत शेतकरी हिताच्या निर्णयाची अपेक्षा होती. परंतु शेतकरी हिताऐवजी त्यांची लूट करण्यात आली. बाजार समितीमधील घोटाळ्याची चौकशी दाबण्यासाठी इतरांच्या बरोबरीने नाहाटा पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची निवडणूक जिंकून फक्त चौकशी थांबविण्यासाठी धडपड सुरू आहे कुंडलिकराव जगताप यांना फिरण्यासाठी लोकवर्गणीतून गाडी दिली. परंतु ते विसरले. माझ्या विरोधात सर्वजण एकत्र आले. तालुक्याच्या विकासासाठी सुरू केलेली वारी बंद झाली, परंतु डान्स बारला जाणारे तालुक्याचा काय विकास करणार? ज्या नागवडे, नाहाटा यांच्या गळ्यात गळा घातला आहे त्यांनीच नाहाटा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करायला का लावली होती? असा गौप्यस्फोट माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला.बाबासाहेब भोस म्हणाले, ही निवडणूक जि. प. व पं. स. निवडणुकीची नांदी आहे. मांडवगण गटात आमदार राहुल जगताप गटास पराभूत केल्याशिवाय रहाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. भगवानराव पाचपुते, राजेंद्र म्हस्के, मिलिंद दरेकर, मधुकर लगड, गणेश झिटे, देवा शेळके यांचीही भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)
घोटाळे दडपण्यासाठी विरोधक एकत्र
By admin | Published: October 15, 2016 12:32 AM