जवळे : पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जवळे येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.रविवारी वडनेर बुद्रूक येथे आ. औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठा आरक्षणासाठी पारनेरमध्ये झालेल्या आंदोलनाची माहिती दिली. ही माहिती देताना ‘माझा राजीनामा मागायला गावातले पाच-पन्नास पोरं घरी गेले होते. आम्हाला जायचं होतं मुंबईला. पोलिसांचा फोन आला. त्यांना सांगितलं, जात नाही, काही काळजी करू नका. आॅफिसमध्ये बसलोय, येऊ द्या. आले. निवेदन दिलं. मी म्हणालो, मराठा समाजातील गरीब मुलांना आरक्षण द्यायला माझा व माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. नंबर दोन, राजीनामा मागायचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्यातल्या एकानेही.....मला मत दिलं नाही, निघा. ज्या दिवशी राजीनामा द्यायचा त्या दिवशी माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देईल. निघा.’ असे आपण आंदोलकांना म्हणाल्याचे आ. औटी यांनी वडनेरच्या कार्यक्रमात सांगितल्याची ही व्हिडीओ क्लिप आहे.ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर औटी यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यानुसार जवळे येथील मराठा समाजातील तरूणांनी बुधवारी सकाळीच बसस्थानकासमोर औटींच्या पुतळ्याचे दहन करून त्यांचा निषेध केला. यावेळी भाऊसाहेब आढाव, सुधीर सालके, ज्ञानदेव सालके, कानिफनाथ पठारे, विलास सालके, अनिल रासकर,सतीश रासकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सुपा येथेही पुतळा दहनाचा प्रयत्न झाला.
शिवसेनेचे आमदार विजय औटींच्या पुतळ्याचे दहन : वडनेरमधील कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:54 PM