लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : येथील नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष व संचालक यांना पुन्हा निवडणूक लढविण्यास केंद्रीय निबंधकांनी कायमस्वरूपी अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजावली आहे. संबंधितांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेचा वाढलेला एनपीए व गैरकारभारावर शिक्कामोर्तब करत रिझर्व्ह बँकेने १ ऑगस्ट २०१९ रोजी संचालक मंडळ बरखास्त केले. मात्र, त्यापूर्वीच बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने बँकेत केलेले गैरव्यवहार व भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी झाली होती. ज्या संचालक मंडळाने सहकारी संस्थेत भ्रष्टाचार केला आहे, असे संचालक पुन्हा बँकेत येणार नाही. त्यांना निवडणूक लढवता येणार नाही, तसेच सदस्यही राहता येणार नाही. याबाबत नवी दिल्ली येथील केंद्रीय निबंधकांनी एक धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व माजी संचालकांना गुरुवारी (दि.२५) नोटिसा पाठवल्या आहेत. प्रत्येक संचालकांना स्वतंत्र नोटीस बजावली असून काही माजी संचालकांना शुक्रवारी ही नोटीस मिळाली आहे. यापुढे नगर अर्बन मल्टिस्टेट बँक व इतर सहकारी संस्थांवर निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरवण्यात येऊ नये, अशी विचारणा या नोटीसद्वारे करण्यात आली आहे. याबाबत ३० दिवसांत खुलासा करण्याचाही आदेश दिला आहे. केंद्रीय निबंधक सत्येंद्रनाथ नायक यांनी सदरचा आदेश बजावला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया माजी संचालक व बँकेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिली.
.................
दिलीप गांधी यांच्यासह २० जणांना नोटीस
बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी, तत्कालीन उपाध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह १९ संचालक यांना पुन्हा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांचे खुलासे समाधानकारक न आल्यास ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहेत.