अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’चे कठोर निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे कोरोनाची साखळी खंडित होण्यास बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे. मागील दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. महापालिकेने लागू केलेल्या निर्बंधांमुळे नगर शहरातील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाल्याचे यावरून स्पष्ट होते.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास, चार दिवसात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पार गेलेला दिसतो. परंतु, हे चार दिवस वगळता रुग्णसंख्या तीन हजारांच्या दरम्यान आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक ४ हजार ६९४ वर पोहोचली होती. मात्र शनिवारी हा आकडा खाली आला. शनिवारी ३ हजार ६१३ नव्या रुग्णांची नोंद झाली. रविवारी त्यात आणखी घट होऊन नव्या ३ हजार ३२८ रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, सोमवारी रुग्णांचा आकडा वाढून चार हजारपार गेला. मंगळवारी रुग्णसंख्येत घट झाली. बुधवारी हा आकडा तीन हजारांच्या खाली गेला असून, जिल्ह्यात २ हजार ७११ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कठोर निर्बंधामुळे रुग्णसंख्येत घसरण होत असल्याने कठोर निर्बंधांची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसात रुग्णसंख्या कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणेला आहे.
कोरोनाने ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. गावांसह वाड्या-वस्त्यांवरही कोरोना पोहोचला आहे. मागील एप्रिल महिन्यात नगर शहरात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत होती. परंतु, महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले. वैद्यकीय सेवा वगळता इतर दुकाने, भाजी बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, किराणा दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यास नगर शहरात प्रतिसाद मिळत असून, त्याचा परिणामही आता दिसू लागला आहे. ग्रामीण भागात मात्र अपेक्षेप्रमाणे रुग्णसंखेत घट होताना दिसत नाही. जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर आणि राहाता तालुक्यात दररोज दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. तसेच श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात शंभरहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नेवासा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड तालुक्यात सर्वात कमी रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील पाच तालुके कोरोनाचा हॉट स्पॉट बनले असून, या तालुक्यात उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
....
बरे झालेले रुग्ण
१,८७, १०७
...
सक्रिय रुग्ण
२७,०८६
.....
मृत्यूसंख्या
२,३६५
....
अशी घटली जिल्ह्यातील रुग्णसंख्या...
१-५ - ४२१९
२-५- ३८२२
३-५- २१२३
४-५- ३९६३
५-५- ४४७५
६-५- ४१३९
७-५- ४५९४
८-५- ३६१३
९-५- ३३२८
१०-५- ४०५९
११-५- ३१८४
१२-५- २७११
....
नगरमधील रुग्णसंख्या निम्म्याने घटली
नगर शहरात मागील आठवड्यात पाचशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत होती. परंतु, सोमवारपासून नगर शहरातील रुग्णसंखेत घट झाली आहे. मंगळवारी १९५, तर बुधवारी २५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेने कठोर निर्बंधांची मुदत १५ मेपर्यंत वाढविली असून, पुढील तीन दिवसात किती रुग्ण आढळतात, यावरच पुढील निर्बंध वाढविण्याचा निर्णय अवलंबून आहे.