अहमदनगर: अर्थसंकल्पातील प्रशासनाच्या बेपर्वाईला स्थायी समितीच्या सदस्यांनी चांगलाच लगाम घातला. सदस्यांच्या प्रश्नांसमोर नाचक्की होत असल्याने आयुक्त विजय कुलकर्णी बाहेरगावी निघून गेले. तर कॅफो प्रदीप शेलार यांनी आजारी असल्याचे कारण सांगून पळ काढला. या दोघांच्या अनुपस्थितीने सभापती किशोर डागवाले यांनी समितीची सभा तहकूब केली. शेलार यांच्या आजारपणाची शहानिशा करा असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. गत तीन दिवसांपासून महापालिकेच्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीच्या सभेत चर्चा सुरू आहे. या सभेला आयुक्तांनी फक्त अर्धा दिवस हजेरी लावली. कॅफो दोन दिवस आले. पण त्यांच्यावर होत असलेल्या प्रश्नांच्या भडीमारामुळे ते आजारपणाच्या रजेवर निघून गेले. अंदाजपत्रक कॅफोने मांडले आहे ते नसतील तर सभा तहकूब करा. ते येतील त्यावेळी सुरू करा असा पवित्रा नगरसेवक दीप चव्हाण यांनी घेतला. इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना त्यांना आजारी रजेवर सोडलेच कसे? असा सवाल नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी उपस्थित केला. कॅफो शेलार रजेवर गेले तर त्यांचा पद्भारही कोणाकडे सोपविला नसल्याचे समोर आले. त्यामुळे सभा अर्धा तासासाठी तहकूब करण्यात येत असल्याचे सभापती डागवाले यांनी जाहीर केले. अर्धा तासानंतर सभा सुरू झाली त्यावेळी सहाय्यक आयुक्त संजीव परसरामी यांच्याकडे अतिरिक्त पद्भार सोपविण्यात आल्याचे सांगत नियमानुसार शेलार यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी स्पष्ट करून सभा सुरू करण्याची विनंती केली. कायद्यानुसारच आम्ही मार्गदर्शन करू, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. त्यावरही दीप चव्हाण यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर चर्चा लांबत गेली. त्यातूनच कर वसुलीस शासनाची मान्यता नसल्याचा मुद्दा समोर आला. त्यामुळे डागवाले यांनी ही सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पुन्हा याच विषयावर चर्चा पुढे सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी) तातडीची बैठक सभेत कर वसुलीस शासनाची मान्यता नसल्याचा मुद्दा समोर येताच प्रशासन खडबडून जागे झाले. उपायुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सभा तहकूब होताच विभागप्रमुखांची बैठक बोलविली. आजारपणाची होणार शहानिशा कॅफो प्रदीप शेलार हे खरंच आजारी आहे काय? याची शहानिशा केली जाणार आहे. जबाबदारी ढकलण्यासाठी ते आजारी पडल्याचा आरोप सदस्यांनी केला. महापालिकेच्या नियमात दुजाभाव करत असल्याचा आरोपही झाला.
आयुक्त बाहेरगावी, कॅफो आजारी
By admin | Published: May 23, 2014 1:24 AM