बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : दोन महिने कन्याकुमारीत अडकलेल्या दत्तभक्तांनी हंगेवाडीत (ता. श्रीगोंदा) आल्यानंतर हंगेश्वर विद्यालयात क्वारंटाईन काळात स्वच्छतेचे पारायण सुरू केले आहे. येथील विविध कामे करून विद्यालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.हंगेवाडीतील दत्तभक्त तुकाराम हंडगर, लक्ष्मीकांत अवघडे, रख्माजी प्रभू रायकर यांनी दर्या बापू काळे, श्रीरंग धायगुडे, राहुल रायकर, शिवाजी डोमाळे, रोहिदास घोडके हे ११ मार्च रोजी दत्त पारायण करण्यासाठी कन्याकुमारीला गेले होते. लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते तिथेच अडकले. या काळातही त्यांनी विविध ग्रंथांची सात पारायणे केली.राहुरीचे सुपुत्र प्रशांत वडनेरकर हे कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी आहेत. लॉकडाऊन शिथिल होताच प्रशांत वडनेरकर यांनी या दत्त भक्तांना गावी पाठविण्यासाठी मदत केली ते खासगी वाहनातून हंगेवाडीला परतले. हंगेवाडीच्या कोविड १९ ग्राम सुरक्षा समितीने या आठ जणांना हंगेश्वर विद्यालयात क्वारंटाइन केले. तेथेही ते स्वस्थ बसले नाहीत. सुरुवातीला इमारत सफाईनंतर शौचालयाची स्वच्छता केली. विद्यालयाचा बाहेरील परिसर स्वच्छ करून घेतला. झाडांना वाफे बनविले आणि नवीन झाडे लावण्यासाठी खड्डे खोदले आहेत. यामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.या कामासाठी त्यांना सरपंच सोनाली संतोष रायकर, ग्रामविकास अधिकारी राजू विधाते, आरोग्य सेवक आर. आर. गायकवाड, आरोग्यसेविका निर्मला चौधरी, मुख्याध्यापक अरूण रायकर यांनी मदत केली. क्वारंटाइन काळात हंगेश्वर विद्यालयात स्वच्छतेचे पारायण सुरू झाले. यामध्ये विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. --- हंगेवाडीकरांची दक्षता..हंगेवाडी परिसरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी हंगेवाडीकरांनी सुरुवातीपासून दक्षता घेतली. पुणे, मुंबई येथून येणाºया पळवाटांवर पहारेकरी ठेवले आहेत. गावातील मच्छीबाजार बंद केला. इतर दुकाने कमी काळासाठी उघडी ठेवण्याचे धोरण घेतले. संतोषराव रायकर यांनी वाशीम, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार मजुरांना घरपोहोच करण्यासाठी वाहने दिली. त्यासाठी तहसीलदार महेंद्र महाजन यांनीही मोठी मदत केली.
क्वारंटाईन काळात स्वच्छतेचे पारायण, विद्यालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:31 PM