तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिवे यांची भेट घेऊन शाळा व शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्याप्रसंगी दिवे बोलत होते. यावेळी शिक्षक बँकेचे ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शकील बागवान, उच्चाधिकार समितीचे तालुकाध्यक्ष सरदार पटेल, पालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष राजू गायकवाड, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष वाघमोडे, मंडळाचे कार्याध्यक्ष शाम पटारे, संघाचे कार्याध्यक्ष सिताराम भांगरे, संघाचे सरचिटणीस वाघुजी पटारे,सहचिटणिस अशोक पवार, पालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सरोदे उपस्थित होते.
दिवे म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत श्रीरामपूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासाबद्दल पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या शाळा या इंग्रजी माध्यमाच्या तोडीच्या आहेत. आपले शिक्षक खूप चांगले काम करीत आहेत.
शिक्षकांची सेवा पुस्तके अद्ययावत करणे, गटविमा नोंदी करणे, प्रलंबित बिले अदा करणे तसेच जिल्हा परिषदेकडे अनुदानाची मागणी करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. मागासवर्गीय शिष्यवृत्ती परीक्षा नियोजन व इतर विषयांवर शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली .
सध्या सर्व शाळांना नियमित भेटी देत असून पुढील काळामध्ये कार्यालय आपल्या दारी या योजनेनुसार प्रत्येक केंद्रांमध्ये जाऊन तेथील शाळांचे सर्व प्रश्न समजावून घेऊन जागेवर सोडविण्याचे आश्वासन दिवे यांनी दिले. शिक्षकांच्या पगार बिलाबाबत नव्याने नियोजन करण्याची ग्वाही त्यांनी दिली. संतोष वाघमोडे यांनी आभार मानले .