नगरच्या घनवटांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कृषी कायद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चार सदस्यीय समितीत श्रीगोंदा येथील अनिल घनवट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घनवट यांच्या नियुक्तीचे श्रीगोंदा तालुक्यात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी कृषी कायद्यातील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केेली आहे. चार सदस्यीय समितीत महाराष्ट्रातून स्व. शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव, ऊस दरवाढ, यासह विविध मागण्यांसाठी घनवट यांनी सरकारविरोधात आवाज उठविला. सन १९८४ पासून घनवट हे शेतकरी संघटनेत सक्रिय आहेत. शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्यानंतर घनवट हे शेतकरी संघटनेची धुरा सांभाळत आहेत. शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्रासह पंजाब आणि हरियाणामध्येही शाखा आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके लोकसभेत मंजूर करून कायद्यात रूपांतर केले. नवीन कृषी कायद्यांना हरियाणा, पंजाब व अन्य राज्यांतून जोरदार विरोध झाला. मात्र, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी नवीन कृषी धोरणाला विरोध करण्यापेक्षा विधेयकांतील त्रुटी दूर करून कायद्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका मांडली होती. या समन्वयाच्या भूमिकेचे केंद्र शासनाकडून स्वागतही झाले होते.
...
कोण आहेत अनिल घनवट
अनिल घनवट हे श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रहिवासी आहेत. ते स्वत: कृषी पदवीधर आहेत. सन १९८४ पासून घनवट हे शेतकरी संघटनेत सक्रिय आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांच्या निधानानंतर सन २०१६ मध्ये घनवट हे अध्यक्ष झाले. त्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. या आंदोलनांमुळे त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.
..
न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीत सदस्य म्हणून झालेली नियुक्ती शेतकरी विचाराला दिलेले स्थान आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या फायद्याचे की तोट्याचे हा चिंतनाचा विषय आहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. यावर आपण पूर्वी भूमिका स्पष्ट केली आहे. नवीन कायदे रद्द करण्यापेक्षा त्यात दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तशी भूमिका आपण अभ्यास करून मांडणार आहोत.
- अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना
..
चौकट
... डोळ्यांच्या कडा पाणावल्या
मला माझे वडील जयसिंगराव घनवट यांनी शिक्षणाची संधी दिली; परंतु त्यांनी तू नोकरी न करता शेतकऱ्यांसाठी लढा दे, असे सांगून त्यांनी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत सक्रिय केले. या कार्यासाठी त्यांनी जमीन विकली; पण शेतकरी लढ्यासाठी काहीच कमी पडू दिले नाही. गेल्या महिन्यात वडिलांचे निधन झाले. ते आज असते तर किती आनंद झाला असता, अशी आठवण सांगताना अनिल घनवट यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.