शेवगाव : कोरोना आजाराचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना तीव्र लक्षणे असलेले रुग्ण ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्या अशा रुग्णांना हॉस्पिटल प्रशासनाकडून भरमसाठ बिलाची आकारणी केली जात आहे. सदर वाढीव बिलावर अंकुश ठेवण्यासाठी महसूल व आरोग्य विभागाची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी शेवगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना मनसेचे तालुकाप्रमुख गणेश रांधवणे यांनी निवेदन पाठविली आहे. कोरोनाबाधित झालेले रुग्ण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. असे रुग्ण बरे झाल्यावर तसेच औषधोपचार सुरू असताना मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना भरमसाठ बिल दिले जात आहे. वाढीव बिलामुळे हॉस्पिटल प्रशासन व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये अनेकदा वादविवाद निर्माण होत आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाचा, कोविडयोद्ध्याचा तसेच नातेवाइकाचा वेळ वाया जात आहे, तर रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास एव्हढा खर्च करूनही आपला माणूस गेल्याने नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
यासाठी खालील उपाययोजना आखताना रुग्णांची होणारी लूट व आपत्ती काळात सुसूत्रता आणण्यासाठी हॉस्पिटलकडून दिल्या जाणाऱ्या बिलाची तपासणी करण्यासाठी तालुका स्तरावर महसूल, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त स्थापन करून पथकाकडून बिल तपासणी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.