अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत बदल करून युतीसोबत असणारी आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय काँग्रेस- राष्ट्रवादीची राज्यस्तरावर असणारी समन्वय समिती घेणार आहे. याबाबत अद्याप जिल्हास्तरापर्यंत कोणतीच सूचना अथवा आदेश मिळालेले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली असून काँग्रेसने यासाठी एक पाऊल पुढे यावे, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, येत्या सप्टेंबरला विद्यमान अध्यक्ष विठ्ठलरव लंघे यांचा कार्यकाळ संपत आहे. यापूर्वी बदल करावा की सप्टेंबरपर्यंत थांबावे, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. २३ तारखेला राष्ट्रवादीची राज्यस्तरीय बैठक असून यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात चर्चा होणार आहे. दोन वर्षापासून जि.प.मध्ये राष्ट्रवादी, सेना आणि भाजपा हे सत्तेत आहे. ७५ सदस्यांपैकी सर्वाधिक ६० सदस्य हे आघाडीचे आहेत. सेना आणि भाजपाचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही पक्षाकडून जि.प. सत्ता बदलाबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री पवार यांनी तर नगरच्या जाहीर सभेत उस्मानाबाद आणि नगर जिल्हा परिषदेत एकाच वेळी बदल करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदल होणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बर्याच गोष्टी अवलंबून होत्या. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत युतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात कमालीचे भितीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली नरेंद्र मोदी लाट विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर आपले काय? हा प्रश्न आघाडीतील नेत्यांसमोर आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतील संभाव्य बदलाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात विचारणा केली असता, त्यांनी याबाबत राज्य पातळीवर निर्णय होईल आणि तो सर्व मान्य राहिल असे सांगण्यात आले.नगरसह अमरावती, यवतमाळ, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तडजोडी केलेल्या आहे. या ठिकाणी एकाच वेळी सत्ता बदल होणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या २० सप्टेंबरला विद्यमान अध्यक्ष लंघे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. यापूर्वी बदल करावा की लगेच निर्णय घ्यावा याबाबत मात्र, गोंधळाची स्थिती आहे.येत्या २३ तारखेला मुंबईत राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी जिल्ह्यातून पक्षाचे मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार यांना बोलविण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतील सत्ता बदलाबाबत लोकसभा निवडणुकीवेळी चर्चा झालेली आहे. काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव एकत्र निर्णय घेतील. जिल्हास्तरावर अद्याप काहीच सूचना नाहीत. -जयंत ससाणे, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे. राज्यस्तरावर असणारी दोन्ही पक्षाची समन्वय समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल. -घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष,राष्टÑवादी
जि़प़मध्ये बदलाचा निर्णय समितीकडे
By admin | Published: May 18, 2014 11:17 PM