अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील फायलींची प्रभारी उपायुक्त एस. बी.तडवी यांनी धूळ झटकली. आयुक्त घनश्याम मंगळे यांनी पदभार देताच तडवी यांनी सर्वच्या सर्व प्रलंबित नियुक्त्या मार्गी लावल्या आहेत. सदरच्या फायलींवर स्वाक्षरी करून त्या मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठविल्या असून यामुळे वारसांना कायम नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे महापालिकेला नव्याने १८ कर्मचारी मिळणार आहेत.पथदिवे घोटाळ््यामुळे प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागेवर सध्या सहायक आयुक्त व नगरसचिव म्हणून काम करणारे एस. बी.तडवी यांची आयुक्तांनी नियुक्ती केली. या पदाचा कार्यभार घेताच धडाकेबाज कामगिरी करण्यास सुरवात केली. पहिल्याच दिवशी त्यांनी अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांच्या फायलींवरील धूळ झडकली. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाºयांचे वारस महापालिकेत चकरा मारत होते. या नियुक्त्यांमुळे महापालिकेला ३ लिपिक आणि १५ शिपाई उपलब्ध होणार आहेत. धूळखात पडलेले प्रस्ताव मार्गी लागल्याने कर्मचा-यांनी आनंद व्यक्त केला आहे.
- अमदार जगताप यांचे पत्र
- आमदार संग्राम जगताप यांनीही ११ मार्च रोजी आयुक्तांना पत्र देवून सदरच्या नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी केली होती. एकीकडे महापालिकेत कर्मचारी संख्या अपुरी असताना दुसरीकडे अनुकंपा नियुक्त्या दिल्या जात नसल्याने महापालिकेच्या सेवांवर परिणाम होत आहे. प्रशासनाकडून नियुक्त्या देण्यास मुद्दाम टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आ. जगताप यांनी केली होती.