केडगाव : नगर तालुक्यातील दोन हजार शेतक-यांना अतिवृष्टीची भरपाई मिळाली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान झाले होते.
नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली होती. मात्र नगर तालुक्यातील शेतकरी यापासून वंचित होते. तालुक्यातील २७ गावातील १ हजार ८४० शेतक-यांच्या बॅँक खात्यामध्ये अनुदान वर्ग झालेले नव्हते. याकडे काही दिवसांपूर्वी शेतक-यांनी खासदार सुजय विखे यांचे शेतक-यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी विखे यांनी तातडीने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने नुकसान भरपाई शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर शेतक-यांचे अनुदान जमा झाले. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर अनुदान मिळाल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजना समाजातील लोकसभा मतदारसंघांमध्ये राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतक-यांच्या हितासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत. पीक विमा योजनेचे पैसे प्रत्यक्षात शेतक-यांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी कृषी विभागामार्फत अधिकाधिक योजनांची माहिती करून घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले.