अहमदनगर : भाजपाचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या यंत्रणेकडून सातत्याने संपर्क केला जात आहे, अशी तक्रार काँग्रेसच्या शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत तालुकाध्यक्षांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे गुरुवारी केली़
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्षांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार करत आहोत़ या मतदारसंघातून आपल्या पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ़ सुजय विखे भाजपकडून निवडणूक लढवित आहेत़ त्यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे़ या सभेच्या नियोजनासाठी विरोधीपक्षनेते स्वत: उपस्थित होते़ त्यांनी मोदी यांच्या सभेचे नियोजन केलेले आहे़ तसेच या सभेला उपस्थित राहावे, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना विखे यांच्या यंत्रणेकडून सातत्याने संपर्क केला जात आहे़
याशिवाय काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखेही भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत़ विखे यांच्याकडून सभेचे निमंत्रण दिले जात असून, यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी विनंती शेवगावचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ़ अमोल फडके, श्रीगोंद्याचे प्रशांत दरेकर, जामखेडचे शहाजीराजे भोसले, कर्जतचे किरण पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पत्राव्दारे केली आहे़
कार्यकर्त्यांशी संपर्कमोदींच्या सभेला उपस्थित राहावे, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना विखे यांच्या यंत्रणेकडून सातत्याने संपर्क केला जात असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.