करंजी : सतत दुष्काळी व पावसाचे प्रमाण कमी असलेल्या पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील ३२ गावांची तहान भागविणाऱ्या मिरी-तिसगाव-करंजी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांबाबत गंभीर तक्रारी करण्यात आला आहेत. याची दखल घेत याबाबत शनिवारी बैठक घेणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भागात नेहमीच कमी पाऊस पडतो. उन्हाळ्यात या भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असते. त्यामुळे या भागातील ३२ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी मिरी-तिसगाव-करंजी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केली. ही योजना जिल्हा परिषदेने न चालविता पाणीपुरवठा संस्थेसकडे चालविण्यासाठी देण्यात आली. या संस्थेवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांपासून या पाणी योजनेचे अध्यक्ष म्हणून एकनाथ आटकर काम पाहात आहेत. या पाणी योजनेच्या कारभारावर आक्षेप घेत अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री तनपुरे यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. या पाणी योजनेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्याची उचलबांगडी करून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करावी तसेच पाणी योजनेच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील कार्यकर्त्यांनी केली. तनपुरे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन येत्या शनिवारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले. यावेळी माजी सभापती संभाजीराव पालवे, अमोल वाघ, शिराळचे सरपंच पिनू मुळे, अशोक टेमकर, जालिंदर वामन, तुळशीराम शिंदे, संतोष गरुड आदी उपस्थित होते.