अकोले : निळवंडेच्या डाव्या कालव्यावरील कुंभेफळ-कळस खुर्द हद्दीवर असलेल्या ओढ्यावरील मोरीचे काम सदोष झाले आहे. प्रवरा नदीवरील म्हाळादेवी जलसेतुचे काम धिम्या गतीने सुरु आहे. ओढे, नाले व रस्त्यावरील पुलांची कामे अद्याप सुरूच नाहीत. शेतक-यांच्या बागायती जमिनी खोदून कालव्याचे पाणी लाभक्षेत्राला कसे मिळणार? म्हणून अगोदर बांधकामे पूर्ण करावीत, अशी मागणी तालुक्यातील शेतक-यांनी केला आहे.
मिनानाथ पांडे यांनी एका निवेदनाव्दारे जलसंपदा व महसूलमंत्री यांच्याकडे ही मागणी केली आहे. कुंभेफळ येथील ओढ्याला पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात असते. तेथे फक्त एकच पाईप टाकला आहे. एकाच पावसात पावसाचे पाणी पाईप सोडून शेतात गेले. आताच अशी परिस्थिती असल्यामुळे भविष्यात कालवा फुटून कालव्याशेजारील शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अधिका-यांनी जेथे गरज नाही तेथे जास्त पाईप टाकले. २४ जवळील ओढ्यावर स्लॅबड्रेन न करता छोटी मोरी केल्यामुळे भविष्यकाळात कालव्याच्या बांधकामास धोका होईल. या परिसरातील भागवत कोटकर, संजय पांडे, केशव कोटकर, भानुदास कोटकर या शेतक-यांच्या जमिनी आहे. त्यांनी हे काम चुकीचे झाल्याचा दावा करत येथे मोठा पूल करावा, अशी मागणी केली आहे.
आराखड्यानुसार कालव्यांची कामे सुरु आहे. कुंभेफळला पाईप मोरीच्या पुढे शंभर फुटावर ओढ्याला ड्रेनेज स्ट्रक्चर आहे. पाणी शेतक-यांच्या शेतात जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांच्यासमोर शेतक-यांचे म्हणणे मांडले आहे. वरिष्ठ अधिका-यांकडून पाहणी करुन शेतकºयांच्या हिताचा निर्णय अपेक्षित आहे, असे कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी सांगितले.