लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: सावेडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत मुदतीत काम पूर्ण करा, असे निर्देश आमदार लहू कानडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आमदार कानडे यांनी मंगळवारी सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, उपभियंता ए. एम. कडूस, उपअभियंता सुजाता तुपे, सामाज कल्याण विभागाचे उपायुक्त देवढे आदी उपस्थित होते. तेरा कोटी रुपये खर्चून समाजिक न्याय भवन उभारण्यात येत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतु, इमारतीचे बहुतांश काम अपूर्ण आहे. आमदार कानडे यांनी याबाबत ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सूचना केल्या. हे काम टप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे होते. मात्र तसे केल्यास मुदतीत काम पूर्ण होणार नाही. त्यासाठी इमारतीच्या बांधकामसोबतच इतर संरक्षण भिंत, विद्युतीकरण यासारखी कामेही सुरू करण्याच्या सूचना कानडे यांनी केल्या. त्यानुसार संरक्षणभिंतीचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे ठेकेदाराच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
इतारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच फर्निचरचा प्रस्ताव तयार करून तो सामाजिक न्याय विभागाला पाठवा. फर्निचरसाठी निधी लागेल. हा निधी मिळविण्यासाठी सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठपुरवा केला जाईल. परंतु, त्यासाठी आपला प्रस्ताव तयार असला पाहिजे. सामाजिक न्याय भवनाचे काम पूर्ण होण्यास आधीच उशीर झालेला आहे. इतर जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवनाच्या इमारती कधीच पूर्ण झाल्या आहेत. एकमेव नगर जिल्ह्यातील इमारत अपूर्ण आहे. यापूर्वी जे झाले ते झाले. परंतु, यापुढे दिरंगाई खपूवन घेणार नाही. इमारतीच्या कामाचा यापुढे प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जाईल, असे कानडे यांनी यावेळी सांगितले.
....
इमारतीसमोरील रस्ता महापालिकेने रद्द करावा
अन्य जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्याय भवनासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. नगरमध्ये मात्र शासनाची जागा मिळाली नाही. त्यामुळे इमारतीचे काम सुरू होण्यास विलंब झाला. सामाजिक न्याय विभागाने राज्य परिवहन मंडळाकडून जागा विकत घेतली. विकत घेतलेल्या जागेतून महापालिकेचा डीपी रोड प्रस्तावित आहे. तो महापालिकेने रद्द करावा, अशी मागणी आहे. याबाबत नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे कानडे म्हणाले.
..
सूचना साजिदने फोटा दिला आहे.