----------
ज्येष्ठ शिक्षक नेते, प्राचार्य एम. एस. तथा मोहनराव मरकड यांचे ८ एप्रिल रोजी निधन झाले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ते जनरल बॉडी सदस्य, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक, अध्यक्ष, चेअरमन ही पदे त्यांनी सक्षमपणे सांभाळली. माध्यमिक शिक्षक सोसायटीतील सहकार सेवा मंडळाचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांसदर्भात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सरचिटणीस, सचिव, अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. शिक्षक म्हणून सेवाकार्य करणारे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. सेवाकाळात अनेक उपक्रम राबवून ज्ञानदानाच्या क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी केली. अशा या चारित्र्यसंपन्न कै. मोहनराव मरकड यांच्याविषयीच्या आठवणी आमदार सुधीर तांबे यांनी या लेखातून सांगितल्या आहेत.
---------
काही माणसं आपल्या कार्यकर्तृत्वाने या समाजापुढे आदर्श निर्माण करतात. ते गेले तरी त्यांचे कार्य हे समाजाच्या कायम लक्षात राहते. असे माझ्या जीवन प्रवासातील एक जाणते शिक्षक नेतृत्व म्हणजे मोहनराव मारकड तथा जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एम. एस. या नावाने प्रसिद्ध असलेले प्राचार्य एम. एस. मरकड सर. त्यांच्या निधनाची वार्ता गुरुवारी मला शिक्षक मित्रमंडळीकडून समजली आणि त्यांची कारकीर्द माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. माझा आणि त्यांचा कौटुंबिक स्नेह गेली ३०-३५ वर्षांचा. ते शिक्षण चळवळीमध्ये माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या माध्यमातून जिल्ह्याला परिचित झाले तसे माझा त्यांचा संबंध आला, तसेच टी. डी. एफ. शिक्षक संघटनेचे ते अनेक वर्षे पदाधिकारी होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये त्यांनी आपल्या शिक्षण सेवेत केलेले कार्य हे प्रत्येक शिक्षकाच्या लक्षात राहणारे आहे. त्यामुळे त्यांची अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून काम केले, त्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी लोकसहभागातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या. यामध्ये इमारत उभारणी, शालेय साहित्य घेण्यासंदर्भात एखादी गोष्ट असेल तर ते सर्व गावाला विश्वासात घ्यायचे. तेथील प्रत्येक पक्षाच्या नेत्याशी चांगले संबंध ठेवत. मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत फिरत असताना, अनेक शाळांत जात असताना मला तेथील शिक्षक आवर्जून सरांचा उल्लेख करायचे. तेव्हा मला त्यांच्या कार्याचे कौतुक वाटायचे. शिक्षक म्हणून ते मला परिचित होते. मात्र, मरकड कुटुंबाचे व राजळे कुटुंबाचे गेल्या अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध आहेत. त्यांचा दोघांचाही एकच तालुका असल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनचे त्यांचे संबंध होते. अप्पासाहेब यांच्या तोंडून नेहमी मोहनराव यांच्या कार्याचा उल्लेख होत असे. त्यानंतर राजीव राजळे यांना भेटत असताना तेथे मरकड सर यांचे चिरंजीव किशोर यांची ओळख झाली आणि तिथून आमचा कौटुंबिक संबंध वाढत गेला. माझ्या प्रत्येक निवडणुकीत सर, त्यांच्या पत्नी, किशोर व मरकड परिवाराने नेहमीच पुढाकार घेऊन मताधिक्य कसे देता येतील याकडे लक्ष दिले. सरांनी शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण व्यासपीठ, इतर सेवाभावी संघटनांच्या माध्यमातून चांगले सामाजिक कार्य केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शिक्षक सेवक कल्याण निधीच्या उभारणीत त्यांचा मौलिक वाटा होता. त्यांचे आणि संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते स्व. रामनाथ वाघ यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यातून त्यांनी यशवंतराव चव्हाण व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर केलेले काम मी जवळून पाहिले आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीत पंधरा वर्षे संचालक, सहा वर्षे अध्यक्ष, तीन वर्षे चेअरमन आणि अनेक वर्षे सहकार सेवा मंडळाचे प्रतिनिधित्व करीत त्यांनी त्यावेळी केलेले नेतृत्व हे आजही प्रत्येक शिक्षकांना परिचित आहे. सध्या वयोमानाने त्यांना बाहेर पडता येत नसे. तरी त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. त्यामुळेच माणूस समोर आला की त्याला ते चटकन ओळखायचे. माध्यमिक शिक्षक सोसायटीबरोबरच मुख्याध्यापक संघामध्येही त्यांचे काम उल्लेखनीय राहिले आहे. अनेक वर्षे सरचिटणीस व नंतर काही काळ अध्यक्ष राहिल्याने जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेमध्ये त्यांची ओळख होती.
सहज बोलत असताना मला त्यांच्याबद्दल जी माहिती मिळाली त्यातून मला कुतूहल निर्माण झाले होते. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की सरांनी खूप शिकावे. मात्र, तशी परिस्थिती नव्हती. अशा वेळी ते नगरला आले. अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या दुकानात नोकरी करून उच्च शिक्षण घेतले. लग्नानंतर पत्नीला जास्त शिकविले. त्यांनीही शिक्षण क्षेत्रातच कार्य केले. त्याचबरोबर त्यांना सामाजिक कार्यातही प्रोत्साहन दिले. नगर जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ प्राध्यापिका मेधा काळे यांनी पस्तीस वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या अंबिका महिला बँकेच्या स्थापनेमध्ये मरकड ताईंचा महत्त्वाचा सहभाग होता, तेव्हापासून आजपर्यंत त्या बँकेच्या संचालिका आहेत. त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा दिली.
मी ज्यावेळी नगरला येई व मला वेळ मिळाला तर मी आवर्जून त्यांना भेटून पुढे जात असे. कारण मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत होती. मला त्यांच्याविषयी नेहमीच आपुलकी राहिली आहे आणि आयुष्यभर राहील. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील जाणकार नेतृत्वाला आपण मुकलो. असे शिक्षण चळवळीतील नेतृत्व तयार होणे ही खरी गरज आहे. त्यांनी नि:स्वार्थपणे शिक्षण क्षेत्रामध्ये, चळवळीमध्ये काम केले. ते जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाच्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली.
-आ. डॉ. सुधीर तांबे
--
फोटो-०८ मोहनराव मरकड