सुहास पठाडे नेवासा : विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, विद्यार्थी ‘टेक्नोसॅव्ही’ व्हावेत या उद्देशातून भालगाव (ता. नेवासा) जिल्हा परिषद शाळेत ‘ई-वेस्ट’पासून कॉम्प्युटर म्युझियम तयार केले आहे. येथील प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा उपक्रम राबविला.जगासमोर आज ‘ई प्रदूषणा’चे संकट उभे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळत नाही. ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. ‘ई वेस्ट’पासून साकारलेल्या या कॉम्प्युटर म्युझियममुळे या दोन्ही समस्येवर प्रभावी उपाय सापडला आहे. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या वापराची बरीचशी कल्पना आली आहे. मोबाईल व कॉम्प्युटर या दोन्हींच्या रचनेत व वापरात खूप साधर्म्य आहे. वापराविषयी माहिती असलेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरच्या रचनेविषयी खूप अज्ञान आहे. हेच अज्ञान दूर करण्यासाठी शिंदे यांनी स्वत:च्या घरातील २००० सालच्या सिआरटी मॉनिटरपासून आॅल-इन-वन कॉम्प्युटर, फ्लॉपी, ड्राईव्ह ते पोर्टेबल हार्ड डिस्क, वेगवेगळ्या केबल्स, सर्व कार्ड्स वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या माहिती व व प्रत्यक्ष हाताळणीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. हे सर्व निकामी आहे व ते शाळेच्या भिंतीवर बसविलेले आहेत. साहित्य निकामी असल्यामुळे म्युझियम तयार करण्यासाठी एक रूपयाही खर्च झाला नही. तंत्रज्ञानातील बदल वेगवान आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर व मोबाईल तंत्रज्ञानाशी संबंधित स्पेअर्स फार झटपट अपडेट होतात. जुन्या व निकामी स्पेअर्सचे काय करायचे हा प्रश्न प्रत्येक वापरकर्त्यास असतो. तो प्रश्न त्यांनी निकाली काढला.डिजिटल ग्लास बोर्ड, रोबोट टीचर, आन्सरिंग बोर्ड यानंतरचा कॉम्प्युटर म्युझियम हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात मार्गदर्शक व्हावा हीच अपेक्षा, असे शिंदे यांनी सांगितले.
भालगावच्या झेडपी शाळेत कॉम्प्युटर म्युझियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:10 PM