अहमदनगर : अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावणारे व कोलकातापर्यंत मराठी नाटक घेऊन जाणारे नाट्य लेखक, दिग्दर्शक कृष्णा वाळके या तरुणासह त्याच्या सहकाऱ्यांनी ‘गाव तिथं नाटक’ या संकल्पनेतून गावोगाव लाली व अंत्यकथा या पारितोषिक विजेत्या नाटकाचे प्रयोग सुरू केले आहेत. शहरी भागांत अनेक नाटके होतात. मात्र, गावातल्या लोकांना क्वचितच नाटक पहायला मिळते. त्यामुळे गावोगाव नाट्यजागर सुरू केल्याचे वाळके यांनी सांगितले.
तुमचं-आमचं संस्था आणि सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टतर्फे गावोगाव नाटकांचे प्रयोग करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. शहरांमध्ये वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग होत असतात. त्या तुलनेत ग्रामीण भागात नाटकांचे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे गावातल्या लोकांना नाटक पाहता येत नाही. कोलकाता येथे झालेल्या ८व्या रंगयात्रा राष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये लाली नाटक सादर करताना जेथे जागा मिळेल, तिथे नाटक सादर करण्याचा मंत्र मिळाला. हा मंत्र घेऊन आता आम्ही गावोगाव नाटकांचे प्रयोग हाती घेतले आहेत. पहिला प्रयोग श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे झाला असून, दुसरा प्रयोग आष्टी येथे होणार आहे, असे वाळके यांनी सांगितले.
............
कोरोनाबाबत काळजी घेऊन हे सर्व नाट्य प्रयोग सादर केले जात आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक गावात नाटक जावे, असा आमचा मानस आहे. ग्रामीण भागातील रसिकांना नाटकांचा आनंद लुटता यावा. प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असलेल्या मुलांना गावाकडे तमाशात काम करतो काय? असं म्हणतात. तमाशा ही स्वतंत्र कला आहे आणि नाटक ही स्वतंत्र कला आहे. गावातल्या लोकांना म्हणूनच नाटक पहायला मिळावं, यासाठी आम्ही गावोगाव नाटक घेऊन जात आहोत.
-कृष्णा वाळके, लेखक, दिग्दर्शक
.............................
पुरस्कारप्राप्त नाटके गावकऱ्यांच्या भेटीला
लाली या नाटकाला अनेक पारितोषिके मिळाली असून, यातील अनेक कलाकारांनाही वेगवेगळ्या भूमिकांना पुरस्कार मिळालेले आहेत. ‘अंत्यकथा’ हे नाटक प्रमोद खाडिलकर यांनी लिहिलेले आहे. तर ‘लाली’ हे नाटक कृष्णा वाळके यांनी लिहिलेले आहे. या दोन्ही नाटकांचे दिग्दर्शन कृष्णा वाळके करीत असून, सहदिग्दर्शन शुभम घोडके करीत आहे. यात अथर्व धर्माधिकारी, ऋषी सकट, सनी सकट, ऋषी हराळ, नीलेश लाटे, विशाल शेळके, ऋषभ कोंडावर, संकेत जगदाळे, पवन पोटे, प्रिया तेलतुंबडे, रेणुका ठोकळे, योगीराज मोटे यांच्या भूमिका आहेत.