श्रीगोंदा : ग्रामपंचायत हे ग्राम विकासाची मुख्य संसद आहे. सत्ताधारी व विरोधी पदाधिकाऱ्यांनी समोरासमोर येण्यापेक्षा शेजारी शेजारी बसून ग्रामविकासाची संकल्पना सत्यात उतरवावी, असे प्रतिपादन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले आहे.
स्वः शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठानने शिवाजीराव नागवडे यांच्या ८७ व्या जयंती निमित्ताने श्रीगोंदा येथे मंगळवारी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत भास्कर पेरे यांनी ‘माणसात देव आहे’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले.
पेरे पुढे म्हणाले की, शिवाजीराव नागवडे यांनी घरचा डबा घालून सहकारी संस्था व शैक्षणिक मंदिरे उभी केली. त्यामुळे त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळत आहे. त्यांचे अनुकरण सर्वांनी करण्याची गरज आहे.
लोकशाहीत सत्ता भोगताना पदाधिकाऱ्यांनी पदापेक्षा जनहिताला प्राधान्य दिले तर निश्चित जनतेचा या प्रकियेवरील उडत चाललेला विश्वास पुन्हा दृढ होईल.
नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, ‘तालुक्यात सहकारी साखर कारखानदारी उभी केली. शैक्षणिक संस्थांचे जाळे तयार केले. त्यांचा आदर्श विचार, प्रेरणा हे युवा पिढीला दीपस्तंभ ठरत आहे.’
यावेळी माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, ‘शिवाजीराव बापू यांनी सहकाऱ्यांमुळेच मी आमदार झालो, याची जाणीव आहे; पण ते आपल्यात नसल्याने उणीव भासते.’
बाबासाहेब भोस म्हणाले, ‘राजेंद्र नागवडे व राहुल जगताप यांच्या वडिलांनी उभी केलेली साखर कारखानदारी व दिलेला विचार तुम्ही हातात हात घालून जोपासण्याची गरज आहे.’
यावेळी बाळासाहेब नाहाटा, संजय जामदार, रमेश लाढाणे, बाबासाहेब इथापे, प्रेमराज भोयटे, माणिकराव पाचपुते, स्मितल वाबळे, बाळासाहेब उगले, हरिभाऊ कापसे, भागचंद घोडके, सुभाष शिंदे, राकेश पाचपुते, सचिन लगड, प्राचार्य ज्ञानदेव खांदवे, प्रभारी प्राचार्य सतीश सूर्यवंशी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पवार यांनी केले. आभार धर्मनाथ काकडे यांनी मानले.
....
आधी फटकारले.. नंतर माफीनामा
पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत माझी भूमिका आणि मुलीचा पराभव यावरील बातम्यांचा धागा पकडून भास्कर पेरे यांनी आपल्या भाषणात मीडियाला चांगलेच फटकारले आणि या सुंदर कार्यक्रमात असे बोललो.. यावर माफीही मागण्यास पेरे विसरले नाहीत.
...
१९श्रीगोंदा पेरे पाटील
...