राज्याच्या विविध भागातून हजारो भाविकांनी दिवसभरात देवीचे दर्शन घेतले. देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे व अस्मिता भिल्लारे, देवीभक्त अलका गायके व विजय गायके यांनी सपत्नीक देवीची महापूजा, होमहवन केले. यावेळी वेदमंत्राच्या घोषाने परिसर दुमदुमला. देवस्थानमार्फत वासंतिक, शारदीय व शाकंभरी अशी तीन नवरात्र साजरी होतात. शाकंभरी नवरात्रोत्सवामध्ये रोज पारंपरिक उत्सव, त्रिकाल, आरत्या, सुवासिनी पूजन, अन्नदान असे कार्यक्रम झाले. शाकंभरी पौर्णिमेला गावोगावच्या सुवासिनी विविध प्रकारच्या पालेभाज्या व पुरणपोळीचा महानैवेद्य देवीला आणतात. नवसाची पूर्ती झाली म्हणून सुवासणी जेवू घालण्याची परंपरा आहे. औरंगाबाद, बीड, पुणे, नाशिक, कल्याण, मुंबई यासह राज्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवस्थानचे विश्वस्त ॲड. विजयकुमार वेलदे, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदी उपस्थित होते. शरद कोतनकर, वदन कुलकर्णी, विवेक मुळे, भूषण साकरे यांनी पौराहित्य केले.
फोटो आहे