राहाता : राष्ट्रीय महामार्ग नगर-मनमाड रस्त्यावर धुळीचा धुरळा, तर पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहरातून होणारी अवजड वाहनांच्या रहदारीमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने महामार्गाची अवस्था खड्ड्यांतून फुफाट्यात अशी झाली आहे.
गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यानंतर सरकारने डागडुजी करून नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती केली होती. यावर्षी रस्ता खराब होणार नाही, असे सर्वांना वाटत होते. या वर्षी सरासरीच्या प्रमाणात कमी पाऊस होऊनदेखील पुन्हा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. यावर्षी पुन्हा रस्ता खराब झाल्याने त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता काही ठिकाणी मुरुम टाकला आहे. यामुळे वाहनाच्या रहदारीमुळे धुळीचा धुरळा उडताना दिसत आहे. नगर-मनमाड महामार्गावरून प्रवास करताना धूळ डोळ्यांत जात आहे. राहाता शहराबाहेरून जाणारा शिर्डी बायपास रस्ता खराब असल्याने अवजड वाहनाची रहदारी राहाता शहरातून सर्रासपणे सुरू आहे. महामार्गावरील धुळीचा धुरळा, रस्त्याची चाळण व अवजड वाहनांच्या रहदारीमुळे राहाता शहरात वाहतुकीची सतत कोंडी होत असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
........................
नगर-मनमाड महामार्गावर पेपर व मिठाई विक्रीचे दुकाने आहेत. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे व्यवसाय करणे अतिशय कठीण होत आहे. सकाळी तासभर वेळ दुकान स्वच्छ करण्याकरिता जातो. दुकानातून टोपलीभर धूळ निघते.
- श्रीनिवास लोंढे, विक्रेता, राहाता
.......................
मला माझ्या कामानिमित्त नेहमी राहुरी, कोपरगाव या ठिकाणी जावे लागते. मोटारसायकलवरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
- ॲड. सुनील सोनवणे, राहाता
................................
रस्त्याची एकदा डागडुजी केल्यानंतर चार-पाच वर्षे तरी रस्ता टिकला पाहिजे. दरवर्षी पाऊस होऊन रस्ता खराब होतो. मग प्रत्येक वर्षी फक्त नावालाच रस्ता दुरुस्त होतो का ?
-संदीप पुंड, नागरिक, राहाता