अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व शासकीय कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कार्यवाही करावी. याबाबत आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने तत्काळ संबंधित विभागाच्या समन्वयाने पूर्तता करावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी यंत्रणेला दिला आहे.
मुंबईजवळील विरार येथे झालेल्या हॉस्पिटल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी भोसले यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा आरोग्ययंत्रणचे अधिकारी उपस्थित होते.
खासगी हॉस्पिटल, लॉबमध्ये बिल आकारणीबाबत लेखापरीक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. किराणा मालाची वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी पुरवठा निरीक्षक यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांना थेट कोरोना रुग्णांच्या वार्डात प्रवेश न देण्यासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहेत. सर्व नोडल अधिकाऱ्यांना नागरिकांचे फोन उचलण्याचा आदेश दिला आहे, तसेच फोनवर येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोना उपाययोजनांसाठी ग्राम समित्या, वार्ड समित्याही स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
-------------
इथे देणार पोलीस बंदोबस्त
जिल्हा सामान्य रुग्णालय
ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट
अमरधाम (नालेगाव, नगर)
ऑक्सिजन वाहतूक
---------------------
गर्दी नियंत्रणासाठी भरारी पथके
खासगी हॉस्पिटल व लॅबच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने, गर्दी नियंत्रण करण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. सर्व खासगी कोविड रुग्णालयांना उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे भेटी देऊन तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवावी. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरचे वाहतुकीदरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास, त्यांचे निराकरण करण्याच्या काम कार्यकारी दंडाधिकारी यांची तत्काळ नियुक्ती करावी. केंद्र व राज्याकडून ऑक्सिजन नगरच्या हद्दीत आल्यास त्याबाबत दक्षता घेण्यासाठीही स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे.
---------------------
खासगी डॉक्टरांचे चार तास कोविड सेंटरसाठी
ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास त्यांचे शंभर टक्के विलगीकरण करण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटरवर सेवा देण्यासाठी खासगी डॉक्टरांच्या सेवा आवश्यकतेप्रमाणे दर दिवशी चार तासांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. तसा निर्णय बैठकीत झाला, तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांशी दिवसातून एक वेळा बैठकही घ्यायची आहे.
--
फाईल फोटो- नियोजन भवन