अहमदनगर : राजकीय कारणावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक योगिराज गाडे व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.गाडे यांनी बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, केडगाव पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दि. ६ एप्रिल रोजी मतदान केंद्राबाहेर आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, मयुर राऊत व माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी राजकीय वादातून शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी या चौघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.यावर राष्ट्रवादीकडून बोरकर यांनीही बुधवारी तोफखाना पोलीस ठाण्यात योगिराज गाडेंविरोधात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, दि. २२ मे रोजी सायंकाळी तारकपूर बसस्थानकाजवळ शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे हे त्यांच्या एनोव्हा (एमएच १६ ३६२५) कारमध्ये आले व त्यांनी मला ‘तुझ्या आमदाराला ३०२च्या गुन्ह्यात अडकवले आहे. तू जास्त बडबड करू नको, नाहीतर तुझे देखील हातपाय तोडू’ अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी योगिराज गाडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.राष्ट्रवादीनेही दिली बदनामीची तक्रारअनिल राठोड यांच्यासह शिवसेनेची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केडगाव येथील संग्राम कोतकर व प्रमोद ठुबे यांनी कोतवाली पोलिसांकडे बुधवारी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व आमदार अरूण जगताप यांच्याविरूद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकल्याप्रकरणी योगेश साळुंके यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार अर्ज केला आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीचे सोशल मीडियावरही युद्ध सुरू झाल्याची चर्चा आहे.