अहमदनगर : नगरसेवकांचा वाढता हस्तक्षेप आणि अपुरे डोस यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडाला. दरम्यान, डॉनबास्को येथील केंद्रावर वादावादी झाल्याने तेथील केंद्रावर लस दिली गेली नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेले नागरिक रिकाम्या हाती परत गेले.
महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर सध्या दुसरा डोस दिला जात आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मंगळवारी दिला गेला. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार असल्याचे मेसेज नगरसेवकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मंगळवारी लसीकरण केंद्रावर एकच गर्दी केली. परंतु, पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने अनेकांना दुसरा डोस मिळू शकला नाही. काल मंगळवारी गोंधळ उडाला. बुधवारी कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार असल्याचे महापालिकेकडून बुधवारी सायंकाळी जाहीर केले गेले. पहिला डोस घेतलेल्यांच्या तारखेनिहाय दुसऱ्या डोससाठी याद्या तयार करण्यात आल्या. तसेच यादीत नाव असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पालिकेतून फोनही केले गेले. त्यामुळे बुधवारी गोंधळ होणार नाही, अशी अपेक्षा प्रशासनाला होती. परंतु, दुसऱ्या दिवशी सावेडी, नागापूर आणि कॉटेज कॉर्नर येथील लसीकरण केंद्रांवर गोंधळ झाला. यादीत नाव नसलेल्या नागरिकांनीही लस घेण्यासाठी गर्दी केली होती. डॉनबास्को येथील केंद्रावर तर तालुक्यातून नागरिक आले होते. त्यांनी लस देण्याची मागणी करत गोंधळ घातला. त्यामुळे तेथील लसीकरण थांबविण्यात आले. आरोग्यसेविका लस न देता तेथून निघून आल्या. दरम्यान, कर्मचारी संघटनेचे आनंत लोखंडे यांनी आरोग्य सेविकांची भेट घेऊन विचारपूस केली असता आरोग्यसेविकांनी याबाबत कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वातावरण निवळले. सावेडी केंद्रात मात्र लस गेली कुठे, आम्ही सकाळपासून रांगेत उभे आहोत, असे म्हणत नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
......
लसीचा नाही पत्ता, अनं नगरसेवक म्हणतात केंद्र वाढवा
महापालिकेला पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे आहेत त्या केंद्रांवरच नागरिकांना लस पुरत नाही. नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. परंतु, लस उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगितले जाते. त्यामुळे आहे त्याच आरोग्य केंद्रांवर लसीसाठी वाद होत असताना नगरसेवक आणखी केंद्र वाढविण्याची मागणी करू लागले आहेत. महापालिकेची सात आरोग्य केंद्र आहेत. आता नागापूर व बोल्हेगाव येथे नव्याने दोन केंद्र वाढविण्यात आली आहेत. केंद्र वाढल्याने लस वाढवून मिळत नाही. आहे त्याच लसीचे विभाजन करावे लागत असल्याने लसीची अक्षरश: पळवापळवी सुरू आहे. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली असून, ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
.....
मनपा प्रशासनाने घेतली बघ्याची भूमिका
लसीकरण केंद्रांवर नगरसेवकांचा हस्तक्षेप वाढला आहे. नगरसेवक केंद्रावर येऊन आपापल्या प्रभागातील नागरिकांना लस देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे नियोजन कोलमडत असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रांवर गोंधळ सुरू असताना महापालिका प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
.....