मिलिंदकुमार साळवे अहमदनगर : सहकारातील गैरव्यवहार, अपहार, गैरप्रकारांना चाप लावण्याचे काम सहकार विभागाचे आहे. पण सहकार विभागातील अधिकारी व काही प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून गैरव्यवहारावर पडदा टाकण्याचे काम कशा पद्धतीने करतात? याचा एक नमुनाच राहाता तालुक्यातील वाकडी (गणेशनगर) येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत पहावयास मिळत आहे. या पतसंस्थेत अपहार झाल्याने निदर्शनास येऊनही संबंधित लेखापरीक्षकाने गुन्हा दाखल करण्याचे अधिकार असताना गुन्हा दाखल न करता पतसंस्थेच्या पदाधिकाºयांना वाचविण्याचा प्रकार केला आहे.सहकार विभागाच्या फिरत्या पथकातील वर्ग-१ चे विशेष लेखापरीक्षक एस. डी. कुलकर्णी यांनी केलेल्या संस्थेच्या चाचणी लेखापरीक्षणातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रमाणित लेखापरीक्षक व्ही. ई. चंदने यांनी वर्धमान पतसंस्थेचे सन २०१३-१४ चे वैधानिक लेखापरीक्षण केले. या अहवालाच्या पान क्रमांक ११ वर चंदने यांनी पतसंस्थेच्या ढवळपुरी शाखेत ८ लाख ५६ हजार ३१५ रूपयांचा अपहार झालेला आहे. या अपहाराबाबत तपासणी करून तपासणी अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संस्था प्रशासनाकडून सांगितल्याने याबाबत सर्व जबाबदारी संस्था प्रशासनावर ठेवण्यात येत असल्याचे चंदनेंच्या अहवालात नमूद केले आहे. पतसंस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण हे महाराष्टÑ सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ नुसार केलेले आहे. त्यातच कलम ८१ (५ब) मध्ये लेखापरीक्षक आपल्या लेखापरीक्षा अहवालात कोणतीही व्यक्ती, लेख्यासंबंधातील कोणत्याही अपराधाबद्दल किंवा इतर कोणत्याही अपराधाबद्दल दोषी आहे, या निष्कर्षापर्यंत आला असेल, त्याबाबतीत तो, त्यांचा लेखापरीक्षा अहवाल सादर केलेल्या दिनांकापासून १५ दिवसात निबंधकांकडे विनिर्दिष्ट विशेष अहवाल दाखल करील. संबंधित लेखापरीक्षक निबंधकांची लेखी परवानगी प्राप्त केल्यानंतरच अपराधाचा प्रथम माहिती अहवाल (एफ.आय.आर.) दाखल करील, स्पष्टपणे म्हटले आहे. या बाबीचे पालन चंदने यांनी केले नाही. तसेच चाचणी लेखापरीक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे आॅगस्ट २०१८ पर्यंत अपहाराबाबतचा विशेष अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षक तसेच जिल्हा उपनिबंधकांना सादर केलेला नाही. त्यामुळे प्रमाणित लेखापरीक्षक व्ही. ई. चंदने कसूरदार असल्याचे विशेष लेखापरीक्षक एस. डी. कुलकर्णी यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या चाचणी अहवालात म्हटले आहे. त्यामुळे चंदने यांनी विशेष अहवाल सादर न करून पतसंस्थेतील अपहार दडपल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी एस. डी. कुलकर्णी यांनी सादर केलेला चाचणी लेखापरीक्षण राहात्याच्या सहायक निबंधकांकडे पाठवून त्यावर तत्काळ वैधानिक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेबाबतचा चाचणी लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाला होता. पण या पतसंस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे आमच्या कार्यालयाच्या कार्यकक्षेबाहेर ही पतसंस्था असल्याने याबाबत जिल्हा उपनिबंधकांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्यामुळे राहाता सहायक निबंधक कार्यालयाऐवजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून या चाचणी अहवालावर पुढील कार्यवाही अपेक्षित आहे. -जितेंद्र शेळके, सहायक निबंधक, राहाता.
(क्रमश:)