जामखेड : नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मतदारांच्या नावांचा सावळा गोंधळ झाला आहे. अनेक मतदारांचे प्रभागच बदलले आहेत. ते राहतात एका प्रभागात आणि त्यांची नावे दुसऱ्याच प्रभागात आहेत. त्यामुळे नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींची पडताळणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
याबाबत मुख्याधिकारी यांनी असा प्रकार झाला असेल तर मुळाशी जाऊन दोषींवर कारवाईची ग्वाही दिली आहे.
नगरपरिषद प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीत एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्याचे प्रकार झाले आहेत. याबाबत माजी नगरसेवकांनी नातेवाईक व जवळचे मित्र प्रभागात घेऊन प्रभागात वर्चस्व निर्माण होईल, या दृष्टीने प्रयत्न केल्याचा आरोप भाजप व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबत स्पॉट पंचनामा करण्याची मागणी केली आहे.
काही येथे रहिवासी नसलेले तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याच्या तक्रारी आहेत. २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हरकतींचा ओघ मुख्याधिकारी व प्रशासकाकडे सुरू झाला आहे. सर्व २१ प्रभागात अनेक तक्रारी सुरू झाल्या आहेत.
------
माजी नगरसेवक व इच्छुकांनी सुचविलेली नावे निवडणूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी विशिष्ट मतदार यादीत घुसडण्याचा प्रकार झाला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड झाली आहे. त्यामुळे एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात गेली.
-राहुल उगले,
जिल्हा कार्याध्यक्ष, युवक काँग्रेस
-----
प्रभाग दर्शक नकाशामध्ये प्रभाग क्रमांक १६ मध्ये समाविष्ट असताना यातील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक ५ व २० मध्ये आहे. त्यांची स्थळ पाहणी करावी यासाठी हरकत दिली आहे.
-अर्जुन म्हेत्रे,
तालुका उपाध्यक्ष, भाजप
-----
प्रभागातील नावांचा गोंधळ झाला असेल तर हरकतीनुसार स्थळ पाहणी करून मतदार संबंधित प्रभागातील आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येईल. त्याबाबत पुरावे घेण्यात येतील. मतदार ज्या प्रभागातील रहिवासी आहे, त्या प्रभागात त्याचे नाव समाविष्ट करण्यात येईल.
-मिनीनाथ दंडवते,
मुख्याधिकारी, जामखेड