अहमदनगर : एका व्यक्तीचा खासगी रुग्णालयातील कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, याच व्यक्तीने येथील जिल्हाशासकीय रुग्णालयात केलेल्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे़ त्यामुळे संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह असाप्रश्न नातेवाईकांसमोर निर्माण झाला आहे़
नगर तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय महिलेच्या छातीत दुखू लागले़ पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना कोविडची चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला़ खाजगी प्रयोगशाळेतील डॉक्टरांनी सकाळी दहा वाजता महिलेच्या स्त्रावाचा नमुना घेतला़ त्याचा अहवाल शनिवारी आला़.
हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांनी संबंधित महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आणले़ जिल्हा रुग्णालयाचा अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाला़ जिल्हा रुग्णालयाने संबंधित महिला कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला़ दरम्यान नातेवाईकांनी खासगी प्रयोगशाळेतील अहवालाचा आधार घेऊन महिलेला खाजगी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले़ पण, शासकीय रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह आल्याने पुढे उपचार सुरू ठेवावेत की रुग्णाला घरी घेऊन जावे, असा प्रश्न आता नातेवाईकांसमोर आहे़.
काही दिवसांपूर्वी तोफखाना भागातील एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या घरातील सर्वांचे जिल्हा रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह आले. त्यांनी पुन्हा खासगी रुग्णालयात जावून चाचणी करून घेतली असता सर्वच पॉझिटिव्ह आले. नंतर तब्बल एक दिवसानंतर त्यांना घेण्यासाठी रुग्णवाहिका दारात आली.आजीसोबतच्या नातवाचा अहवाल निगेटिव्हयेथील ७० वर्षीय आजीबार्इंना दम्याचा त्रास होता़ म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तिथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली़ अहवाल पॉझिटिव्ह आला़ अहवाल येईपर्यंत त्यांना शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले़ दरम्यान आजीबार्इंचा मृत्यू झाला़ आजीबार्इंचा अहवाल पॉझिटिव्ह होता़ त्यामुळे कुटुंबातील सर्वांनीच महापालिकेच्या कोविड चाचणी केंद्रात तपासणी केली़ त्यांचे सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़ परंतु, सर्वाधिक काळ आजीबार्इंसोबत असलेल्या नातवाचा अहवाल निगेटिव्ह आला़ हा नातू खासगी व शासकीय रुग्णालयातही आजीसोबतच होता़