अहमदनगर: शिवेसेनेचे दिवंगत नेते स्व. अनिलभैय्या राठोड यांचा शहरातील जुन्या महापालिका कार्यालयाच्या आवारात पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच कार्यालयास जननायक स्व. अनिलभैय्या राठोड भवन नाव द्यावे, या मागणीसाठी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांनी जुन्या मनपा कार्यालयात दाखल होत भिंतींवर स्व. अनिलभैय्या यांचे फोटो चिटकवत त्यांचे नाव देऊन नामकरण केले. यावेळी अमर रहे, अमर रहे, अनिलभैय्या अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना काळे म्हणाले काँग्रेसने मार्च महिन्यात शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख (ठाकरे गट) संभाजी कदम, मनपा स्थायी समिती सभापती यांना लेखी निवेदन देत जुन्या मनपा कार्यालयात स्व. राठोड यांचा पुतळा बसविणे व नामकरण करण्याची लेखी मागणी केली होती. मनपात सेनेचा महापौर असून सत्ता सेना- राष्ट्रवादीची आहे. त्यात शिवसेना नगरसेवकांची संख्या जास्त आहे. अनेक वर्ष शहरात शिवसेना-भाजप युती राहिली आहे. त्यामुळे ही मागणी एकमुखी तत्काळ मान्य होईल. अनिलभैय्या यांचा विषय असल्यामुळे शिवसेना कॉग्रेसची मागणी डावलणार नाही, अशी काँग्रेसला आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. विशेष म्हणजे असा ठराव करण्याचा विषयच मागील दोन्ही महासभांमध्ये विषय पत्रिकांवर घेण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक होत महासभेच्या ठरावाची प्रतीक्षा न करता थेट नामकरणच करून टाकले आहे. असे ते म्हणाले.
यावेळी यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, उषा भगत, राणी पंडित, जरीना पठाण, पूनम वन्नम, अलतमश जरीवाला, मनसुख संचेती, रतीलाल भंडारी, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, विकास भिंगारदिवे, आकाश अल्हाट, आनंद जवंजाळ, बापू जपकर, गौरव घोरपडे, प्रवीण गीते, आर. आर. पाटील, कल्पना खराडे, मुक्ता डहाळे, सविता कपिले, सोफियान रंगरेज, मिनाज सय्यद आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.