शहरातील खड्डेमय रस्त्यांसंदर्भात काँग्रेसचे भर उन्हात ठिय्या आंदोलन
By अरुण वाघमोडे | Published: May 19, 2023 05:16 PM2023-05-19T17:16:02+5:302023-05-19T17:16:49+5:30
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
अरुण वाघमोडे, अहमदनगर: नगर शहरातील रस्त्यांच्या कामासंदर्भात बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टचे प्रकरण गाजत असताना काम झालेल्या रस्त्यांची इन कॅमेरा गुणवत्ता पडळताळणी करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१९) भर उन्हात येथील प्रोफेसर चौकात
ठिय्या आंदोलन केले. मनपाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल न घेतल्याने उपस्थितांनी तीव्र निषेध केला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फिरत्या लॅबसह सरप्राईज भेट देत शहरातील किमान दहा रस्त्यांची नागरिकांसमवेत संयुक्तरित्या इन कॅमेरा कामांचा
दर्जा तपासण्याची मागणी काँग्रेसने केली होती. यासाठी काँग्रसचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित पुतळा स्थळाजवळ दुपारच्या भर उन्हात छात्र्यांचा आधार घेत ठिय्या मारावा लागला. यावेळी बोलताना काळे म्हणाले शहरातील रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा दर्जा तपासण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. म्हणूनच त्यांनी पळ काढला आहे. मनपा अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरत राजकीय संगनमतातून जनतेच्या पैशांची लूट केली आहे. आमच्या मागणीसंदर्भात आयुक्तांना लेखी पत्र दिले होते. आमदारांसह नगरसेवकांनाही जाहीर आव्हान केले होते. मात्र जनतेच्या दरबारात न येता या सर्वांनीच पळ काढला.
आंदोलनात मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, राणी पंडित,
विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, आकाश अल्हाट, प्रणव मकासरे, सोफियान रंगरेज, किशोर कांबळे, अजय मिसाळ, आरिफ शेख, फिरोज शेख आदींसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.