अहमदनगर : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह इतर आठ ते दहा जणांविरोधात गुरुवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी येथे एका कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, किरण काळे व त्यांच्यासोबत आठ ते दहा जणांनी एमआयडीसीतील एका कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी फिर्यादी तरुणीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच जाताना ‘मी काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष आहे. हे सगळे धंदे बंद करा. नाही तर तुम्हाला सोडणार नाही’, अशी धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आठरे हे पुढील तपास करत आहेत.