नगर दक्षिण लोकसभेसह नगर शहर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा
By अरुण वाघमोडे | Published: June 2, 2023 05:06 PM2023-06-02T17:06:41+5:302023-06-02T17:07:14+5:30
दक्षिणेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसने आपल्याकडे घेतला पाहिजे, असे म्हणत लोकसभेसह शहर विधानसभा मतदारसंघांवर देखील काँग्रेसने दावा केला आहे.
अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेश काँग्रेस कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत घेण्यात आला. नगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे. त्याचबरोबर दक्षिणेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसने आपल्याकडे घेतला पाहिजे, असे म्हणत लोकसभेसह शहर विधानसभा मतदारसंघांवर देखील काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेस नेत्यांसमोर तशी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आग्रही मागणी केली आहे. पक्षाच्या मुंबईतील टिळक भवन येथील प्रदेश कार्यालयात शुक्रवारी लोकसभेची आढावा बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख, सतीश उर्फ बंटी पाटील, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री नसीम खान आदींसह प्रमुख नेते उपस्थित होते.
जिल्ह्यातून आ. लहू कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अनिल चुडीवाला, प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, उत्कर्षा रूपवते, करण ससाणे, विनायक देशमुख, मंगल भुजबळ, प्रशांत दरेकर, अमृत धुमाळ, संभाजी माळवदे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नगर दक्षिणेची जागा काँग्रेसकडे घेत माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना उमेदवार करावे, अशी मागणी यापूर्वीच शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना मुंबईतील बैठकीत राज्याच्या नेत्यांसमोर मांडण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना काळे म्हणाले की, दक्षिण लोकसभा काँग्रेस लढत नाही. सहा विधानसभांपैकी एकही जागा काँग्रेस लढत नाही. दक्षिणेमधील कार्यकर्त्यांना बळ द्यायचे असेल तर या विभागातून काँग्रेसचे किमान दोन आमदार असणे आवश्यक आहे. नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्ष संघटना अत्यंत ताकदीने काम करत आहे. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी किमान एक मतदार संघ हा काँग्रेसकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षाने जागा वाटपात घेतला पाहिजे. यामुळे दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळू शकेल. दक्षिणेतून पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून शतप्रतिशत निवडून येऊ शकतो. आजपर्यंत झालेल्या १८ लोकसभा निवडणुकांपैकी १२ वेळा काँग्रेसचा खासदार सुमारे ४६ वर्ष या मतदारसंघातून निवडून आला आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक अपवाद वगळता ४ वेळा भाजपने या ठिकाणी नेतृत्व केले आहे. मात्र सध्याच्या भाजप उमेदवाराबद्दल दक्षिण मतदारांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे. त्यामुळे काँग्रेस हा मतदार संघ निश्चितपणे जिंकू शकते. जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेतला जावा. कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणतील, अशी भूमिका यावेळी काळे यांनी मांडली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी देखील दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी भूमिका नेतृत्वासमोर मांडली.शिर्डी मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिर्डी मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे. ठाकरे सेनेचे निवडून आलेले खासदार शिंदे सेनेत गेले आहेत. त्यामुळे सेनेकडे स्थानिक सक्षम उमेदवार नाही. उत्तरेत सहापैकी पाच आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. काँग्रेसने ही जागा लढवलीच पाहिजे. अशी भूमिका मांडली.