नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली गेट येथे हे आंदोलन झाले. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी विरोधात दिशाभूल करणारे ढोंगी आंदोलन करण्याऐवजी भाजप नेत्यांनी त्यांच्याच पंतप्रधानांना जाब विचारावा, असा टोला कॉंग्रेसने लगावला आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने भाजपनेही जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. राज्यात असलेले तीन पक्षांचे आघाडी सरकार कुचकामी असून, त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा, ओबीसी मागासवर्गीय समाजाचे आरक्षण धोक्यात आले. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप होऊ देणार आहे, असा इशारा माजी मंत्री राम शिंदे यांनी दिला. नगर शहरात झालेल्या या आंदोलनात खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे सहभागी झाले होते.