कर्जत : उडीद, मका, ऊस यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नावर काँग्रेसने सुरु केलेले आमरण उपोषण तहसीलदरांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंगळवारी हे आमरण उपोषण सोडण्यात आले.शेतक-यांकडून प्रति एकर दोन ऐवजी पाच क्विंटल या प्रमाणे उडीद खरेदी करावी. उडीद खरेदी केंद्रावर हमाली व मशीनच्या नावाखाली शेतक-यांकडून प्रति क्विंटलला १०० रुपये घेतले जात आहेत हा प्रकार बंद करावा. या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. उडीद व मका हमीभावाने विनाअट खरेदी करावी. उसाला ३४०० रुपये भाव मिळावा, आदी विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण उपोषण सुरू केले. या उपोषणाला कर्जत तालुका काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे बाळासाहेब साळुंके, तालुकाध्यक्ष किरण पाटील, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे, संजय तोरडमल, मिलिंद बागल, सतीश पाटील, कुळधरणचे सरपंच अशोक जगताप, उपसरपंच भाऊसाहेब सुपेकर या आंदोलकांशी निवासी नायब तहसीलदार सीताराम आल्हाट यांनी मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली. हे प्रश्न सरकारला कळवू आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी लेखी हमी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्जतमध्ये काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 3:53 PM