अहमदनगर : देशात व राज्यात दररोज इंधनाचे दर वाढत असून, सरकार याद्वारे सामान्य जनतेची लूट करत आहे. यामुळे सरकारविरोधात जनतेतून तीव्र असंतोष उमटत आहे. सरकारच्या या इंधन दरवाढीविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी दुपारी ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. स्टेट बँक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहने ढकलत नेली.काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात गॅसच्या किमती १९ वेळा वाढल्या आहेत, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती तर रोजच वाढत आहेत. आज राज्यात पेट्रोल ८४, तर डिझेल ७३ रूपयांवर पोहोचले आहे. राज्यात इंधनावर वॅटसह विविध प्रकारचे कर लावले आहे. त्यामुळे सरकारने हे कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा.आजचे पेट्रोल व डिझेलचे दर इतिहासात सर्वाधिक आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ थांबवायची आणि निवडणूक झाली की दरवाढ करायची ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे शासनाने सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन इंधनाच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, गौरव ढोणे, मयूर पाटोळे, रियाज सय्यद, सुनील भिंगारे, वसिम सय्यद, समीर शेख, बाळासाहेब भुजबळ, गणेश आपरे, अल्ताफ पठाण, संतोष फुलारी, रजनी ताठे, मुबिन शेख, रूपसिंग कदम, किरण अळकुटे,सुवर्णा ओहळ, ईश्वर जगताप आदी उपस्थित होते.