शिवाजी पवार, श्रीरामपूर (अहिल्यानगर)Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना काँग्रेसने जवळपास सगळ्याच मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली. मात्र, विद्यमान आमदार लहू कानडे यांना पक्षाने मोठा झटका दिला आहे. काँग्रेस पक्षाने श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांची उमेदवारी डावलली आहे. त्यांच्या ऐवजी युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगले यांना पक्षाने संधी दिली आहे.
काँग्रेसने शनिवारी (२६ ऑक्टोबर) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत विद्यमान आमदाराला धक्का दिला आहे. त्यामुळे कानडे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
श्रीरामपूरमधून हेमंत ओगलेंना उमेदवारी
जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे समर्थक असलेल्या हेमंत ओगले यांचे नाव जाहीर होताच ससाणे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या २५ वर्षांपासून येथे विधानसभेला काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे.
'विश्वासघात केला', लहू कानडेंना संताप अनावर
पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार कानडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "पक्षाच्या दिल्ली स्थित नेत्यांनी एका प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्याचा विश्वासघात केला आहे."
"आचार्य अत्रे यांच्यानंतर साहित्य क्षेत्रातून विधानसभेमध्ये निवडून गेलेला मी पहिला आमदार ठरलो होतो. घराणेशाहीतून काँग्रेस पक्षाला बाहेर काढत तळागाळापर्यंत पोहोचवले होते. मात्र या निष्ठेची किंमत पक्षाने ठेवली नाही", असा संताप आमदार लहू कानडे यांनी उमदेवारी डावलल्यानंतर व्यक्त केला.