अरुण वाघमोडे, अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे शुक्रवारी झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहता, श्रीरामपूर यासह नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव व अकोले हे मतदारसंघ पक्षाकडेच घेण्याची आग्रही मागणी जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व शहराअध्यक्ष किरण काळे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.
यावेळी बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणूगोपाल, राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रांताध्यक्ष आमदार नाना पाटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना वाघ व काळे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नगर शहरासह जिल्ह्याच्या एकूण राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एकूण सात जागांवर दावा केला. दक्षिणेत काँग्रेसने विधानसभेची मागील वेळी एकही जागा लढली नव्हती. आता महाविकास आघाडी आहे. शिवसेनेने श्रीगोंद्यावर दावा केला आहे. नगरमध्ये किरण काळेंच्या रूपाने काँग्रेसकडे उमेदवार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नगर शहराची जागा ही काँग्रेसलाच मिळावी. राष्ट्रवादीने त्यासाठी लोकसभेला काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड केली पाहिजे, असे यावेळी वाघ म्हणाले.